आपल्या व्यक्तिमत्व विकासा'च्या समूहावरुन एका मैत्रिणीचा मेसेज आलाय, ती म्हणते, 'माझा स्वभाव थोडासा फटकळ आहे, म्हणून मी लोकांच्यात मिसळत नाही, पण आता मला खूप एकटं एकटं वाटतंय.!'
तर.. काही लोक लहानपणापासूनच एकलकोंडे असतात. अर्थातच ते तसं असण्यामागे बऱ्याच वेळा कौटुंबिक परिस्थिती अवलंबून असते. पण अशा लोकांनी स्वतःवर मेहनत घेणं फारच गरजेच असतं. आयुष्यात एखादी जवळची व्यक्ति प्रत्येकाला हवीच.
कारण ह्या एकलकोंड्या व्यक्ती मनमोकळेपणानी बोलत नाहीत. यांनी जवळच्या व्यक्तीजवळ बोललं तर पाहिजेच, पण रडलंही पाहिजे. कारण रडल्याने तुमचा ताण हलका होतो. निम्मे दुःख, अडचण तिथेच संपेल. स्वतःचे विश्लेषण करत रहावे, म्हणजे माणसं आपल्यापासून दूर का जातात, याची कारणं कळत राहतात.
काही लोक स्वतःला न्यायाधीश समजून समोरच्याला फाडकन बोलून जातात.. सतत तुम्ही समोरच्याचा अपमान करत राहिला तर कधीतरी त्याची सहनशिलता संपतेच ना...! आणि अशी फटकळ माणसं एकटी पडतात..
मी फार तोंडावर बोलतो किंवा बोलते, अशी घमेंड करणारे लोक एकटे पडतात. कारण दुराग्रही लोकांना समोरच्याची बाजू कधी ऐकून घ्यायची, समजून घ्यायची गरज भासत नसते. मग ही माणसं एकटी पडतात. त्यांना आयुष्यभर एकटं रहावं लागतं..
खरतरं या माणसांना स्वतःवर काम करायला हवं, 'दुसरों को कहां तराश रहे हो.. तराशो पहले खुद को.. अगर तुम्हे हिरा बनना है...!' मनाच्या कोपऱ्यात एखादा न्युनगंड आहे का.? कुठली वेदना राहिलीय का.? कारण तुम्ही स्वतःवर काम करुन लोकांच्यात मिसळण्यासाठी स्वतःला समाजाभिमुख करायला हवं. तुसडेपणाचा, दुसऱ्यांचा मत्सर करण्याचा मुखवटा टाकून द्यायला हवा.
कारण मुळात कोणीच खूप चांगला किंवा खूप वाईट नसतो. माणूस काळ्या पांढऱ्या गुणांचे मिश्रण असते. आता आपल्या अंतरंगातील कुठल्या झाडाला खतपाणी घालायचे ते तुम्हीच ठरवायचे. कारण सतत दुसऱ्यांवर जळत राहिलात, कौतुकाचे दोन शब्दही बोलला नाहीत.. तर या नकारात्मक स्वभावाचा तुमच्या शरीरावर, मनावर परिणाम होत असतो.
तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ स्वतःच्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने बोला, मनसोक्त रडा, इथेच तुमचे अर्धे प्रॉब्लेम संपत जातील. सतत स्वतःचे विश्लेषण करा. डायरी लिहीत रहा. प्रसंगातून शिकायचा प्रयत्न करा. खरंतर वेळ काढून नियमित माणसांच्यात मिसळायला हवं.
कारण वेगवेगळ्या विचारसरणीच्या माणसात गेल्यामुळे आपला विचारांचे क्षितिज विस्तारायला मदत होते. आपण सतत विद्यार्थी असायला हवं. आपण जेव्हा मला सगळ कळतं, येतं.. असं जेव्हा म्हणतो, तेव्हाच आपला विकास थांबतो, हे स्वतःला सतत बजावत रहायला हवं.
'मी असंच बोलते किंवा बोलतो', असा वृथा अभिमान न बाळगता आपल्या बोलण्याच्या पध्दतीत सुधारणा करा. ठामपणे बोला, पण शब्दात आणि स्वरात नम्रपणा असू दे.!
वागण्याबोलण्यातून सहकार्याची भावना समोरच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे. शांतपणे मोकळेपणानं वागा. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात, किती श्रीमंत आहात, यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. हे महत्त्वाचे आहे नाही का.??
असे वागलात तर तुम्ही एकटे पडणार नाही. आंब्याच्या झाडाच्या सावलीला लोक येतात मंडळी... बाभळीच्या झाडाच्या खाली कोणी विसाव्याला जात नाही..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)