कितीदा लोक आपला ताडकन् अपमान करतात. सखीसंपदाचे सर्व समुहावरील सभासद मिळून जवळजवळ अडीच हजार सभासद आहेत. आम्ही विचारपूर्वक काही नियमावली केलेली आहे. मित्रमैत्रिणींचे, नातेवाईकांचे समुह असतातच तिथे. आपण सणवार, गुडमाॕर्निंग, गुड नाईट हे तुम्ही तिथे करु शकता.
नियम मोडल्यानंतर आम्ही काही सांगायला गेल्यावर लोक आमचा वेडवाकडं बोलून अपमान करतात.. अर्थातच मन दुखावतं, पण हे दुखावलेपण मी जपत बसत नाही. कारण वेदना सांभाळायच्या नसतात, त्यांचा त्यागच करायचा असतो ना..
एकदा आदरणीय बापूंना एका व्यक्तिने चार-पाच पानांचे गलिच्छ शिव्या लिहून पत्र पाठवले. बापूंनी शांतपणे त्या चार पानांना लावलेली टाचणी काढून घेतली आणि ती पाने कचऱ्याच्या डब्यात टाकली. तिथे असलेल्या सहकाऱ्याने विचारलं, "बापू, आपल्याला राग नाही आला ? कित्ती अश्लाघ्य शिव्या दिल्यात.."
बापू हसत त्या टाचणीकडे निर्देश करत म्हणाले, "त्या पत्रातील हीच एक आवश्यक गोष्ट मी ठेवून घेतली आहे..!" बापू, बुध्द, साने गुरुजी, या माणसांनी आपल्याला हेच शिकवलं. आणि आपण हे शिकलो नाही तर व्यर्थ जन्म आपला..!
यांनी असं म्हणलं, त्यांनी तसा अपमान केला, अशा गोष्टींचा विचार करुन आपण स्वतःला पिडीत समजत रहातो आणि आयुष्यातील कितीतरी जिवंत आणि सुंदर क्षणांना या वेदनांच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. यामुळे जगणं गोठून जातं, उत्तर मिळत नाहीत.
अपमान लक्षात ठेवा. पण तो सूड उगवण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये सुधारणा करुन ताठ मानेनं प्रवास सुरु करायला.. आपोआपच वेदना, अपमानांची शल्यं मागे पडत जातात. जीवन सुंदर आणि समृध्द करण्यासाठी हे फार आवश्यक आहे.. बघा मंडळी पटतंय का..?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)