'दिव्यांग कल्याण विभाग थेट तुमच्या दारी' या अभियानाला उत्तम प्रतिसाद


पुणे - चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेल्या 'दिव्यांग कल्याण विभाग थेट दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीणमधील दिव्यांगांनी उत्तम प्रतिसाद देत त्यांच्यासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमातून एकूण ३३ स्टॉल्सद्वारे राज्य शासन, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषदेमार्फत तसेच विविध महामंडळांमार्फत दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमात निरामय आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रादेशिक कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग आदी विभागांसह दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था सहभागी झाल्या.

सार्थक, बापू ट्रस्ट, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, दिव्यांग, अनाथ व ग्रामीण भागातील आदिवासी व गरीब होतकरु विद्यार्थ्यांसाठी निवासी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन आदींनी स्टॉलद्वारे आपल्या योजनांची माहिती दिली. 

चिंचवड विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी यांच्या वतीने दिव्यांगांच्या मतदार नोंदणीसाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्टॉल द्वारे महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी युवकांना स्वावलंबी व्हा, उद्योजक बना असा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी एकाच ठिकाणी विविध सेवांचा लाभ देण्याचा, योजनांची माहिती देऊन पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याचा अभिनव उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

निगडीहून आलेल्या तीन चाकी सायकलच्या लाभार्थी पिंकी बबन देशमुख यांनी हा कार्यक्रम खूप चांगला आहे, अपंगांना शासनाच्या वतीने मदत मिळत आहे याचा खूप आनंद आहे, असे यावेळी सांगितले.

दिव्यांगांसाठी असा भव्य कार्यक्रम होऊ शकतो असे स्वप्नातही वाटले नव्हते. एकाच ठिकाणी योजनांची माहिती व लाभ मिळाल्यामुळे दिव्यांग बांधव स्वावलंबी होतील, असे सुरेश केरु बोटकर (सांगवी) म्हणाले.

तर 'माझ्या मुलाचा दिव्यांग दाखला घेण्यासाठी येथे आले. ही खूप चांगली सुविधा आहे, असे किरण वाघमारे (वडगाव मावळ, जि. पुणे) यांनी सांगितले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !