हिंदुस्तान लिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अँड लवली या क्रीम नावातून 'फेअर' हा शब्द काढून टाकला. अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे हे... रंगभेद, वर्णभेदाच्या भिंतीनी आजवर माणसाच्या मनामनात दुरावा निर्माण केलेला आहे.
आता परवा अमेरिकेत झालेल्या घटनेने पूर्ण जग ढवळून निघाले होते. पण त्या वर्णभेदाविरुध्द आवाज उठवणारी लोक अन लोकशाही जगाने पाहिली. फेअर अँन्ड लव्हली या कंपनीच्या विरोधात अभिनेत्री नंदिता दास आणि कंगना हिने याचिका दाखल केल्या होत्या. वर्णभेदाला या कंपन्या बढावा देतात असे त्यांचे म्हणणे होते. आणि ते खरंही होते.
नेल्सन मंडेला, महात्मा गांधीजी, बॉक्सर मंहमद अली अशा कितीतरी मोठ्या माणसांना वर्णभेदामुळे अपमानित व्हावं लागलं आहे. भारतीय लोक मुळातच गव्हाळ रंगाचे आहेत. या रंगाविषयी अशी न्युनगंडता बाळगणे म्हणजे मुर्खपणाच वाटतो.
त्वचा आरोग्यपूर्ण, रसरसशीत असेल तर तो रंग कुठलाही असेना ती व्यक्ती सुंदरच दिसते. बरं ही परिमाणं ठरवणारे पुरुषच असतात. सौदर्यांच्या सर्व अटीत फक्त बाईनेच असायला हवं असं यांच म्हणणं.. 'वधू पाहिजे' या जाहिराती पहा.. सडपातळ, देखणी, गोरीपान, मनमिळावू अशीच हवी.
तिला स्वतःच्या इच्छा वगैरे असता कामा नये. आणि जाहिरात देणारा वर मग भलेही टकला, जाडा, नाकाचं भजं असलेला असला तर चालेल, पण ह्याला बायको समाजाने ठरवलेल्या ह्या सौंदर्याच्या मापदंडातीलच हवी.
स्त्रीला तिच्या जाडीवरुन, रंगावरुन सारखं ऐकून घ्यावं लागतं. तिचे झालेले गर्भपात, बाळंतपण, थाॕयराइड, अनेक असणारे मानसिक ताण याने तिच्या शरिराची अवस्था बदलते. मोडकळीस येते. तेव्हा तिला सहचराच्या मानसिक आधाराची गरज असते.
पण अशा टिंगलटवाळीने स्त्रीचं आपण खच्चीकरण करतं असतो, हे पुरुषांच्या गावीही नसतं. स्त्रीने धट्टीकट्टी असावी ते गुरासारखं राबायला नव्हे, किंवा मुलं जन्माला घालायला नव्हे. तर माणूस म्हणून जीवनाचा तिने उपभोग घ्यावा. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणारी माणूसपण आणि माणुसकी जपणारी स्त्री म्हणून !
यावरुन एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एक राजा होता. त्याच्या पत्नीची चर्या नेहमी उदास असे. राजाला कारण जाणून घ्यावसं वाटलं, पत्नीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण ती बोलेना. मग राजा एका ज्ञानी साधूकडे गेला, साधूने समस्या ऐकली, राजाला प्रश्न केला, तुला स्त्री पाहिली की काय आठवतं?
राजा उत्तरला, 'वासना'. साधू म्हणाले, ही वासना काढून टाक डोक्यातून. राजा म्हणाला, वासना वजा केली तर काय रहात स्त्रीत ? साधू महाराज म्हणाले, 'माणूस'. गोष्ट छोटीच आहे पण आपल्याला खूप बोध देऊन जाते.
तिचं माणूसपण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा आदर कोणालाही करावासा वाटतं नाही. तिने सोशल मिडीयावर एखादे मत व्यक्त केले तर तिला अपमानास्पद कमेंटना तोंड द्यावं लागतं. मार्मिक बोलणे, माहितीची समृद्धता, विचांराची प्रगल्भता यामुळे स्वतंत्र विचाराची सक्षम स्त्री हजारातही उठून दिसते.
ती तथाकथित सौंदर्याच्या मापदंडात बसत नसली तरी.. पुरुषांनी आपली मुक्ताफळे उधळण्याआधी थोडासा संयम बाळगावा. आपण किती साजूक आणि निर्मळ आहोत..? दुसऱ्या स्त्रीयांबद्दल अशी घाण तोंडातून काढण्याआधी आपल्या आईला आठवावं.
माझ्या नव्या पिढीची स्त्री नोकरी करतेच पण घरातील बाहेरील जबाबदाऱ्या उत्तम पार पाडतेच. तिचे विचारही तेवढेच प्रगल्भ आहेतच. मला वाटतं नव्या स्वतंत्र भारताच्या स्त्रीसाठी हे पुरेसं आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)