अबब ! सव्वा लाख रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा केला जप्त


अकोला - शहरात बेकायदेशीर शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. दोन अग्नीशस्त्र ( पिस्टल व रिव्हॉल्व्हर ) ७ जिवंत काडतुसे तसेच दोन धारदार लोखंडी तलवार बाळगुन विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

या टोळीतील तिघा जणांकडून पोलिसांनी १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अकोला शहरात संभु राजपुत (रा. खोलश्वर अकोला) हा बेकायदेशीरपणे अग्नीशस्त्र (पिस्टल) व तलवार विक्री करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली. त्याने दोन अग्निशस्त्र (एक पिस्टल व रिव्हाल्वर), तसेच दोन लोखंडी धारदार तलवार हरी झाडे (रा. गौरक्षण रोड अकोला) व आकाश आसोलकर (रा.उमरी अकोला) यांना विकल्याची कबुली दिली.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले. त्यांचेकडुन एक गावठी बनावटीची पिस्टल, एक गावठी बनावटीचे रिव्हाल्वर, ७ राउंड (बंदुकीचा गोळया) दोन धारदार लोखंडी तलवार, असा एकुण १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संगु राजपुत (रा. खोलश्वर, अकोला), हरी झाडे (रा. गौरक्षण रोड, अकोला) व आकाश आसोलकर (रा.,उमरी, अकोला) यांचेविरुध्द कारवाई करून पोलिस स्टेशन सिव्हील लाईन व पोलिस स्टेशन खदान येथे आर्म्स अॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास चालू आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, पोलिस निरिक्षक प्रदिप शिरस्कार, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत फौजदार गोपाल जाधव, सहायक फौजदार दशरथ बोरकर, राजपाल ठाकुर, गणेश पांडे, हवालदार फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखेडे, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर सहभागी झाले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !