गर्दीत दिसणार नाही आता माझं शहर..

शहर. आमचं शहर. बालपणापासूनच या शहराचा हिस्सा आपण सगळेच आहोत.. पुर्वी सकाळी लवकर शाळेत येताना नजरेस पडायचं. आजही पहाटे शहर पुन्हा नव्यानं भेटलं..


तेंव्हा इथल्या इमारती, निद्रिस्त असलेले वाडे, इथली दुकाने हितगुज करीत असतील एकमेकांशी.. किती किती वर्ष एकमेकांच्या सोबतीला आहेत ती या शहरात..

रस्त्यावरील गर्दी होण्याच्या आत त्यांनाही ऐकू येत असतील एकमेकांच्या भावना.. दिसत असतील चेहऱ्यावरील सुरकुत्या.. त्यांनाही होत असेल जाणीव वार्धक्याची.. भिजत असतील डोळ्यांच्या कडा त्यांच्याही...!

हे रस्ते, या इमारती... हे आपलं शहर आहे, आपली संस्कृती आहे... पहाटे खुप छान वाटलं शहराशी बोलताना... किती वर्ष झालीत, दिल्लीगेट, शमी गणपती, विशाल गणपती, चितळे रोडचा दर्गा, चौकातील कारंजा..

शहराची वेदना, त्यांचं दुःख मूकपणे पहात बसलेले चौकातील पुतळे... अन् इथला कापड बाजार. जिव्हाळ्याचा विषय असलेली सिद्धीबाग, म्हणजे बाळासाहेब देशपांडे उद्यान... अन् कित्येक वर्षांपासून कोरडे पडलेले बागेजवळील शंकराचं कारंजं..

हे खरे आपल्या शहराचे चेहरे.. शहर.. धुक्यातील ही पहाट आणि मी... सुर्य उगवायचा आहे अजून... पक्षी इमारतींच्या कोणा एका कोपऱ्यात पहुडलेले... संवाद माझा...शहराचा... रस्त्यावरील ताटकळत उभे असलेले दिव्यांचे खांब...

त्यांचीही आपली एक ओळख.. इथे तशी सगळ्यांचीच आपापली खासियत.. दिल्ली दरवाजा... दरवाजा नसेलही त्याला... पण मनाच्या गाभाऱ्यात रुतून गेलंय त्याचं दार.. उजाडताच येतील रस्त्यावर सारे हळूहळू.. गर्दी करतील.

वाहनांच्या आवाजाने, रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांनी ऐकूही जाणार नाही आपला आवाज.. फ्लेक्सचे चेहरे झाकून टाकतील माझ्या शहराला... पक्षी लांब उडून जातील आकाशात.. गर्दीत दिसणार नाही आता माझं शहर...

फ्लेक्सवरील असंख्य डोळे वटारून पाहतील, शहर निपचित बसेल एका कोपऱ्यात... नजरेला नजर द्यायचं धाडस देखील उरणार नाही मग त्याच्यात...!

- जयंत येलुलकर
(माजी नगरसेवक, अध्यक्ष रसिक ग्रुप, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !