दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे, याचा कधीच आपण अंदाज न लावलेला बरा. कारण हवामान तज्ञांच्या सारखाच कधी कधी नाही, तर बऱ्याचदा तो फेलच ठरू शकतो. हे सांगायचं कारण म्हणजे 'लाली'.! आता तुम्ही म्हणाल 'लाली'चं काय मध्येच ? तर इथून पुढं 'लाली' मधी मधी येतच राहणार. कारण ती आता खूप मोठ्ठी झालीय.
खुप दिवसांनंतर आम्ही 'लाली'चा पुण्यात प्रयोग करायचं धाडस केलं. त्यात ४१ व ४२ प्रयोग लागोपाठ होते. पुण्याच्या द बॉक्स एरंडवणेमध्ये. ह्यावेळी 'लाली' जरा वेगळी करायची ठरवली होती. म्हणलं आपण रोजच प्रोसेनियम करतो आता जरा ३६०° चा एक्सपरिमेन्ट करून पाहुयात.
कोलकत्तामध्ये एका नॅशनल थिएटर फेस्टिवलमध्ये असा प्रयोग आम्ही केला होता. पण लोकं येतील का ? आले नाही तर ? प्रयोग जर प्रेक्षकांपर्यंत पोचला नाहीतर इथून पुढं कोणतंच नाटक करायचं नाही. असेच विचार मनात येऊन जायचे.
पब्लिसिटीला काही कमी नव्हती ठेवली. काही न काही आपल्या लेव्हलला प्रेक्षकांपर्यंत पोचवत राहायचो. पण प्रयोगाच्या दिवसापर्यंत बुकींग नाही. वीस तीस येणार होते. म्हणलं आता संपलो. कारण खर्च होणार होता घरी पोचेपर्यंत जवळपास १५ हजारपर्यंत. त्यात सकाळपासून पुण्यात पाऊस जोऱ्यात. त्यामुळे म्हणलं आता पाऊस सुद्धा आपल्या मुळावर उठणार की काय ?
म्हणजे शेतात उभं राहून आभाळ हेपालताना आपलासा वाटणारा पाऊस पुण्यात मात्र नकोसा झाला होता. पण थिएटरमध्ये गेलो आणि काहीसं मनातून हे सगळं निघून गेलं. त्याला कारण होतं द बॉक्स मधील सगळं नियोजन. प्रदीप वैद्य सर आणि त्यांची सर्व टीम हे काटेकोरपणे सगळं काम करते, हे पाहून जीव सुखावला. कारण एनर्जी शिस्तबद्धता पाहून वाढतेच.
याचसोबत आपली 'तुमचं आमचं'ची एनर्जीचं भांडार असलेली टीम. ज्याचं काम चालू होतं. अंदाजपत्र सोडून आता वर्तमानपत्रमध्ये मी हळूहळू येत होतो. जशी पहिल्या ६ च्या प्रयोगाची वेळ जवळ येईल तशी मनातली धाकधूक मात्र वाढत होती. आणि तिसऱ्या घंटेआधी मला कुणाचा तरी आवाज ऐकू आला की लवकर सुरू करूया सगळी मंडळी आली आहेत. आणि प्रयोग हाऊसफुल्ल आहे.
मनात म्हणलं चला आता उकळ्या फुटल्या तर फुटल्या. प्रयोग सुरू झाला आणि टाळ्या, शिट्ट्या, वाह, अश्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटू लागल्या. मी ग्रीन रूम मधून हे सगळं अनुभवत होतो. आणि माझ्या एन्ट्री ची तयारी सुरू करत होतो. प्रयोग इतका रंगला की मी कधी स्टेजवर गेलो आणि आलो कळलंच नाही.
चारही बाजुंनी बसलेले प्रेक्षक मंडळी चारही बाजुंनी येणाऱ्या पात्राना त्यांच्या स्पेस मध्ये जाऊन निवांत बसून आनंदाने अनुभवत होती. मला तर प्रेक्षकांमध्ये, स्टेजवर व पडद्याआड असे तीन 'लाली'चे प्रयोग चाललेत असं वाटत होतं. कारण सगळे एकजीव होते.
पडद्यावर संकेत (किसण्या), रेणुका (आवली), प्रतीक (नाम्या) आणि अण्णा म्हणून मी तर पडद्याआड 'लाली' म्हणून सगळं बॅकस्टेज सांभाळून घेणारा अथर्व, सोबतीला इकडं तिकडं जिकीरीने पळणारा प्रतीक, त्यांच्या जोडीने जयदीपही हे ते काम करत होता. मोहिनी त्याला साथ देत होती. अण्णाला म्हातारा करण्यात व्यग्र होती.
महेश सोबतीला होताच. कोमल आणि तुषार बाहेर तिकीट खिडकी सांभाळत होती. पवन कलाकारांचे प्रकाशयोजनेच्या रूपाने चेहरे खूप गोड हुशारीने दाखवत होता. दीपक त्याला सहाय्य तितक्याच जागरूकतेनं करत होता. राकेश पार्श्वसंगीतातून वातावरण निर्मिती करण्यात मश्गुल होता.
तालमीत त्यानं खूप शिव्या, ओरडा खाल्ला पण इथं त्यानं बरोबर प्रेक्षकांना संगीत खाऊ घातलं. प्रणव सपकाळे प्रयोगाला नव्हता पण प्रेक्षकांमध्ये होता. कारण पब्लिसिटी मधून त्यानं काम केलं होतं. निर्मितीमध्ये 'लाली' पोचवण्यासाठी सहाय्य करणारे 'गार्गी'चे गणेश काकडे सर ही पोरांसाठी काय हवं नको ते सगळं बघत होते.
असे सर्वच जण. प्रत्येक दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या पण असणाऱ्या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतोच. तसा अनेकांचा होता. या सर्वांच्या सहकार्याने अखेर पहिला हाऊसफुल्ल प्रयोग वाजला. प्रेक्षकांना खूप आवडला. आणि इतक्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या की काही तर ६ वेळा बघूनही लाली पाहायला आले होते.
डोळे भारावून गेले होते. आणि अश्यात दुसरा प्रयोगही जवळपास हाऊसफुल्लच होता. पहिल्या प्रयोगाला उशिराने आलेल्या काही मंडळींना आत जागा अभावी बसवता आलं नाही त्यामुळे त्यांना माघारी जावं लागलं. त्या सर्वांची माफी मागतो. पुढच्या प्रयोगाला या नक्की.
तर असे प्रचंड उत्तम प्रतिसाद मध्ये दोन्ही प्रयोग पार पडले. यांत सर्व टीमने खूप मोलाची भूमिका बजावली. दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्या कामाला सलाम करतो. जे मला हवं ते त्यांनी अत्यंत सृजनशीलतेने देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांची कामे चांगली झाली. ज्यामुळे आता आम्हा सर्वांना अजून एनर्जी आली की आता मोठ्ठी झालेली 'लाली' आपण सगळीकडे फिरवू.
तर अश्या प्रकारे 'लाली'नं एका प्रकारे आम्हाला पुन्हा जिवंतच केलं. अनेकजण बोलतात 'लाली' परत परत का.? त्या सर्वांना एकच उत्तर की त्यासाठी परत परत बघा. कारण आम्हाला प्रत्येक प्रयोगात जे नव्यानं गवसतं, ते खूप आनंद व समाधान देणारं असतं. त्यानं प्रेक्षकही सुखावतो.
३६०° मध्ये केलेला प्रयोग इतका आवडला की अनेकजण पुन्हा लावा अजून मंडळी घेऊन येतो, अशी बोलली. म्हणून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा आम्ही प्रयोग लावत आहोत.
हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे की आलेला अनुभव म्हणजे तोट्यात जातो, असं वाटणारा प्रयोग अचानक हाऊसफुल्ल होतो. तर फक्त प्रेक्षकांनीच नाही तर प्रतिक्रियाने सुद्धा. कालचा दिवस कधीच विसरता येणार नाही. त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद. ऋणात.
लालीचे महाराष्ट्र भर कुठेही प्रयोग करायला आम्ही येऊ शकतो. आपण फक्त आवाज द्या. आम्ही हजर असू.
- कृष्णा वाळके (लेखक व दिग्दर्शक)
संपर्क - ८७८८१२१६२४