यु ट्यूबवर मध्य प्रदेशातील छत्रसाल राजाच्या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती असलेला कार्यक्रम पहात होतो. मध्य प्रदेश येथील छतरपुरनगर तथा छतरपुर जिल्हा हे नाव महाराज छत्रसाल यांच्या नावावरून देण्यात आले. तेथील किल्ला भव्य दिव्य, वास्तू कलेचा सुंदर नमुना होता.
किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे त्याकाळी या राज्याच्या वैभवाची खूण होती. सध्या या किल्ल्याची असलेली आजची अवस्था पाहता आपल्याला इतिहास, वारसा यांच्याविषयी किती घेणे देणे आहे, आत्मीयता आहे, याचा प्रत्यय येतो.
भारताला प्राचीन वारसा, संस्कृती, परंपरा आहे. इथला गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी केवळ भारतीयच नाही, तर परदेशातूनही पर्यटक येत असतात. आपल्याकडे असलेला हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे आपला गौरव आहे. परंतु आपल्याला याचे म्हणावे तेवढे गांभीर्य नाही, हे दुर्दैवाने सांगावेसे वाटते.
जगात असे कितीतरी देश आहेत ते केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. त्या देशांची अर्थव्यवस्था यावरच आधारीत आहे. तेथील पर्यटन, ऐतिहासिक संचितांना तेवढेच महत्व आहे...!
राजा छत्रसाल यांच्या किल्ल्याचे खंडहर झालेले प्रवेशद्वार पाहताना मला आपल्या फराहबागेची आठवण झाली. ही संपन्न वास्तू देखील एकेकाळी अहमदनगरच्या समृद्धीची ओळख होती. त्यावेळी देशात तीन शाह्या अतिशय महत्वाच्या होत्या. एक दिल्लीची कुतुबशाही, दुसरी विजापूरची आदिलशाही अन् तिसरी अहमदनगरची निजामशाही..
त्याकाळी विविध ठिकाणचे राजे, सरदार व्यापाराच्या, राजकीय स्नेहाच्या निमित्ताने अहमदनगरला भेट देत. त्यावेळी फराहबाग अर्थात हवामहल येथे या पाहुण्यांची भेट ठरलेली असे. त्याकाळी या फराहबागेच्या भोवताली नयनरम्य तळे होते. येथे येताना होडीतून यावे लागे. तळ्यात जगातील विविध जातींची कमळ फुले असायची. थुईथुई नाचणारी कारंजी उडत.
ताजमहालचा निर्माता शहाजहान देखील येथे येऊन गेला आहे. त्याकाळी येथे आलेले राजे, महाराजे, विविध पाहुणे फराहबाग पाहून सुखावून जात असत. अन् वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या भव्य वास्तूच्या प्रेमात पडत. असे आपल्या शहराचे सौंदर्य होते.
छत्रसाल राजाच्या किल्ल्याचे किंवा भारतातील अनेक मौल्यवान ऐतिहासीक वास्तूंचे जे आज खंडहर झाले आहे. तीच अवस्था मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगरच्या फराहबागेची, भुईकोट किल्ल्याची म्हणावी लागेल.
गेल्या काही वर्षात वास्तूकलेचा सुरेख नमुना असलेला फराहबाग आता केवळ सांगाडा बनून राहिला असुन, भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावर मोठमोठी झाडे उगवली आहेत. झाडांचे मूळ किल्ल्याच्या बुरुजामधे खोलवर रुजलेली असुन किल्ल्याचे बुरुज केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहेत.
नगरच्या वैभवशाली इतिहासाची ही आजची दयनीय अवस्था.. अन् आपण मात्र म्हणायचं भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक व्हायलाच हवा. याच किल्ल्यात स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२ ते ४५ मधे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या महान नेत्यांना ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले होते.
निजामशाहीपासून कुतुबशाही, पेशवाई, ब्रिटिश राजवट अशा विविध टप्प्यांचा, आक्रमणांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आज सरकारच्या लेखी दुर्लक्षित बनून राहिला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील विविध कालखंडाचा साक्षीदार असलेला हा किल्ला खरेतर 'युनेस्को'च्या वारसा मानांकन यादीमध्ये यायला हवा.
निदान हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. याचे औचित्य साधून तरी किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे. याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन याचा इतिहास जगासमोर यायला हवा. आज हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे, म्हणुन निदान व्यवस्थित तरी आहे. नाहीतर काय अवस्था झाली असती, याची कल्पना करवत नाही.
आपल्याला यांची काहीही किंमत वाटत नाही, की कोणती खंत देखील वाटत नाही. परंतु याच वास्तू परदेशात असत्या तर त्याचं योग्य संवर्धन झालं असतं. त्यांची जपणूक केली गेली असती, अन् ती शहरे जगाच्या पर्यटन नकाशावर आली असती.
राज्यकर्त्यांनी केवळ सत्ता उपभोगायची नसते. तर त्या त्या शहरांच्या संस्कृतीची, इतिहासाची जपणूक करीत त्या शहराला समृद्ध करण्याचे कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडायचे असते.
नाहीतर मुघलांशी चिवटपणे लढा देत त्यांना नामोहरम करणारा राजा छत्रसेन किंवा सम्राट अकबराशी झुंज देणारी राणी चांदबीबी, यांच्या कार्य कर्तुत्वाची ओळख हळूहळू पुसून जात आपल्या शहराचा विकास करताना त्यांनी त्या काळात बांधलेल्या सुंदर वास्तूंचे खंडहर व्हायलाही वेळ लागणार नाही.
निदान शहराच्या पर्यटन विकासासाठी, बाजारपेठेच्या भरभराटीसाठी, तरुणांच्या रोजगारासाठी तरी इथल्या इतिहासाची संचिते जपायला हवीत. नाहीतर कोणी म्हणेल तरी का आज, की आपलं अहमदनगर शहर एकेकाळी निजामशाहीची राजधानी असलेलं कैरो, बगदाद या शहरांच्या तोडीचं सुंदर शहर होतं.!
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)