शाब्बास ! अखेर 'खऱ्याखुऱ्या' पोलिसांनी जेरबंद केलं 'तोतया'ला


कडक खाकी गणवेश, कारच्या डॅशबोर्डवर राजमुद्रा असलेली टोपी, हुबेहुब पोलिस अधिकाऱ्यासारखा रुबाब, यामुळे तो लोकांना खराखुरा फौजदारच वाटायचा. पण अखेरीस एकदाचं त्याचं पितळ उघडं पडलं, अन तोतया पोलिस अधिकाऱ्याला खऱ्याखुऱ्या पोलिसांनीच गजाआड केलं आहे.

हा प्रकार घडला अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात. पोलिस अधिकारी असल्याने सांगून इक इसम लोकांची फसवणूक करत होता. पण क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सतिष काशिनाथ झोजे (वय २९, हल्ली रा. ढवणवस्ती, तपोवनरोड, अहमदनगर) असे त्याचे नाव आहे.

तो मूळचा राहणार मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. तो स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १२ एचव्ही ९०८१ मध्ये सिटी लॉन्स, पाईपलाईन रोड, येथे उभा असून त्याच्या कारच्या डॅशबोर्डवर पोलिस ऑफीसर कॅप आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली.

त्यामुळे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आपल्या टीमला त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या टीमने घटनास्थळी जाऊन खात्री करत गाडीजवळ उभा असलेल्या इसमाची चौकशी केली. आपण फौजदार असून नगरच्या पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असल्याचे त्याने सांगितले.

खऱ्या पोलिसांनी त्याला ओळखपत्र मागितले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी थेट मुख्यालयात चौकशी केली. तेथे त्या नावाचा कोणीही अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे हा इसम तोतया असल्याची त्यांची खात्री पटली.

त्याची खास स्टाईलने अधिक चौकशी करताच तो पोपटासारखा बोलु लागला. त्याने आपले खरे नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता सतिष काशिनाथ झोजे परि. पोलिस उपनिरीक्षक नावाची नेमप्लेट, टोपी, त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईनयार्ड, असा गणवेश सापडला.

पोलिसांनी त्याची कार जप्त केली आहे. अहमदनगर क्राईम ब्रँचचे पोलिस अतुल लोटके, सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर गवांदे, रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक करणे आणि इतर कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !