साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणार
मुंबई - डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणात दरवाढ होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारात केंद्र शासनाच्या दि. २ जून २०२३ च्या अधिसूचनेन्वये डाळींच्या साठ्यावर (तूर व उडीद) घाऊक, किरकोळ व्यापारी, मिलर्स व इम्पोर्टर्स यांच्यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त साठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध पुरवठा यंत्रणेकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे. केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर डाळींचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे. तूर व उडीद डाळींचा साठा निर्बंध खालीलप्रमाणे.
- घाऊक व्यापारी - प्रत्येक डाळीसाठी २०० मेट्रीक टन
- किरकोळ व्यापारी - प्रत्येक डाळीसाठी ५ मेट्रीक टन
- बिग चेन रिटेलर्स - प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी ५ मेट्रीक टन व डेपोसाठी २०० मेट्रीक टन मिलर्स
गत तीन महिन्यांतील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू होईल. इम्पोटर्स - सीमा-शुल्क मंजूरीच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करून ठेवता येणार नाही. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.