राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर खूनप्रकरणी भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे गजाआड


अहमदनगर - सावेडी उपनगरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा सोमवारी पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री एकविरा चौकात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी कुख्यात गुंड व भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश चत्तर यांच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे, कुऱ्हे, कांबळे, बुलाखे यांच्या विरोधात पूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, सोमवारी पहाटे उपचार घेत असताना अंकुश चत्तर यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सुरुवातीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यात आता खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस देखील करत होते.

याप्रकरणी पोलिसांनी रविवारी नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह इतर आरोपींना मराठवाड्यातून अटक केलेे आहे. या सर्व आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्या रुग्णालयात चत्तर यांच्यावर उपचार सुरू होते, तेथे रविवारी दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. तसेच सावेडी उपनगरात देखील मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता. सोमवारी दुपारी मोठ्या पोलिस बंंदोबस्तात चत्तर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !