चत्तर कुटुंबियांनी मांडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कैफियत
अहमदनगर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणी त्यांचे मेहुणे बाळासाहेब सोमवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली व हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.
तसेच या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सोमवंशी म्हणाले, गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून भविष्यात संरक्षण मिळावे याकरिता हा खटला न्यायालयात चालू होईल, त्यावेळी सरकारी पक्षाची बाजू भक्कम व निपक्षपातीपणे मांडण्याकरिता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.
आरोपी हे सराईत व राजकीयदृष्ट्या भक्कम आहेत. त्यामुळे माझ्या मेहुण्याच्या कुंटुंबियांनाही त्यांच्यापासून भविष्यात धोका आहे. मुख्य आरोपी स्वप्निल शिंदे, तसेच अभिजीत बुलाख , सुरज कांबळे हे सराईत गुन्हेगार असून या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हत्याकांडाची घटना इतकी क्रूर आणि भयभीत करणारी होती की चत्तर यांना मारहाण चालली होती, त्यावेळी आरोपी आरडाओरड करत होते व चत्तर यांच्या बचावासाठी जे जवळ येत होते, त्यांनाही ते मारहाण करत होते, असे सोमवंशी म्हणाले.
यावरुन हल्लेखोरांना अंकुश चत्तर यांची हत्याच करायची होती, व त्याच उद्देशाने ते त्यांना मारहाण करीत होते, हे सिध्द होते, असे मयत अंकुश चत्तर यांचे मेहुणे सोमवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.