खरंच 'या' शहराची संस्कृती जपली जात आहे का?


मी माझ्या शहरात राहतो. माझ्या शहराचा विकास हे सर्वांप्रमाने माझेही स्वप्न आहे. हे शहर सुजलाम, सुफलाम व्हावे ही माझी इच्छा आहे. इथल्या तरुणाईला, शहराचे उद्याचे भविष्य असलेल्या प्रत्येकाला आपल्या भूमीचा अभिमान वाटायला हवा, असं माझे शहर विकसित व्हायला हवं, हे इतरांप्रमाणे मलाही नेहमीच वाटतं असतं.

माझं शहर ऐतिहासिक आहे, समृद्ध परंपरा लाभलेले आहे, याची मला जाणीव आहे. पण, या शहराची ही संस्कृती, त्याची गरीमा जपली जात आहे का? असं मला आता वाटायला लागलंय.  खरेच या ऐतिहासिक, धार्मिक शहराचे वैभव सर्वदूर पसरले आहे का?

पुण्यापासून अवघे ११८ किलोमीटर अंतरावर असलेले हे खरंच शहर तितकेसे विकसित झाले आहे का, हा प्रश्न मला आता पडायला लागला आहे. इथली संस्कृती खरेच जपली जात आहे का? आपण सहनशील, मान खाली घालून जगणारी माणसे.. ही आपली ओळख दुःखदायक आहे, याची मला तरी आता शरम वाटायला लागलीय..

मी माझ्या शहरात रहातो, वावरतो. इथेच शेवटचा श्वास घेणार आहे. माझ्या शहराचा विकास म्हणजे देशाचा विकास ही माझी धारणा आहे. इथला भुईकोट किल्ला ढासळायला लागलाय, त्याची कोणतीही लाज आपल्याला वाटेनाशी झालीय..अन् कशाला दिल्लीच्या महालाची काळजी करीत बसलाय.. 

याची खरी खंत वाटतेय आता मला. इथली तरुण मुले पोटपाण्याच्या शोधासाठी माझ्या शहरातून परागंदा झालीत, याचे काहीही दुःख कोणालाही वाटेनासे झाले आहे.. शहर खंडहर झाले तरी कोणालाही याची वेदना होत नाही.

स्वतःचं पोट भरलं, कमाई झाली तर खरा विकास असं जर सगळ्याच नेत्यांना वाटू लागलं असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतं असावं? निवडणुका आल्या तर पैसे घेऊन मतदानासाठी रांग लावणारे आता या शहरात मोठया प्रमाणावर झाले आहेत.

देशाच्या गप्पा मारणारे मतदान न करता सहलीला जात आहेत. या शहराचे हे वास्तव आहे. ज्याला त्याला सत्ता हवी. कमिशन हवे... बोगस कामे हवीत.. काय करणारं आहात या नोटांचं..? किती पिढ्यांसाठी कमवायचा आहे लोकांचा पैसा.? यासाठी झाला आहात का जनतेचे कैवारी..

रात्री झोपताना थोडं स्वतःशी बोला.. मग लक्षात येईल.. आपल्याला लोकांनी मुजरा घालावा या लायकीचे तरी आहोत का आपण..? कुठे गेलेत विकासाचा अजेंडा काढणारे पक्ष.. कुठे गेले बुजवलेले ओढें..? आहात का खरेच तुम्ही जनतेचे कैवारी..?

की या शहराला लुटायचा ठेका दिला आहे का कोणी तुम्हाला..? अरे चुकलंच यार.. आम्हीच तर तुम्हा सर्वांना शहर लुटायचा, रस्त्याचा डांबर खायचा.. ओढे, नाले बुजवायचा ठेका दिला आहे.. मतदानाला हजार पाचशे रूपये घेऊन. सोबत अर्धी क्वार्टर, बिर्याणी खाऊन..

हो, ठेका दिला आहे आम्हीच.! मग लुटा आता या शहराला.. पाशवी अत्याचार करा या शहरावर. आम्ही मान खाली घालून मुक संमती देणारच आहोत तुम्हाला. लाचार आहोत आम्हीं. तुम्ही पाजलेल्या अर्ध्या क्वार्टरची शपथ..!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !