अहमदनगर - पूर्वसूचना देऊनही कामिका एकादशीपूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ झाली. त्यामुळे याचा निषेध नोंदवण्यासाठी नेवासा येथे आम आदमी पक्षातर्फे चक्क खड्ड्यात वृक्ष लागवड करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच 'आप'च्या आंदोलनास पाठिंबा दिला.
खडका ते नेवासा रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याची दुरुस्ती केली होती. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे.
त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना प्रचंड हाल सहन कराव्या लागणार असल्याची बाब आम आदमी पक्षाच्या लक्षात आली. त्यामुळे आम आदमी पक्षाने या रस्त्याची अवस्था तातडीने सुधारण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे संबंधितांचे लक्ष वेधले.
लेखी निवेदन देऊनही यासंदर्भात कुठलीही उपाययोजना राबवण्यात आली नाही. त्यामुळे नेवासा आम आदमी पक्षाच्या वतीने राजू आघाव, ॲड. सादिक शिलेदार, संदीप आलवणे, भाऊसाहेब बेल्हेकर आदींनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.