कोकणातल्या पालगड या गावी नारायण साने नावाचे गृहस्थ राहत असत. ते वडवली गावाचे 'खोत' होते. त्यांना सदाशिव, विष्णु आणि रामकृष्ण अशी तीन मुले होती. सदाशिवराव यांना 'भाऊराव'ही म्हणत. त्यांच्या पत्नी यशोदा.
या दांपत्यास दोन मुली आणि पाच मुलगे अशी सात अपत्ये. त्यातील चौथे अपत्य म्हणजे 'पंढरीनाथ' याचा जन्म १८९९ च्या डिसेंबर महिन्याच्या २४ तारखेस झाला. हाच पंढरीनाथ पुढे 'पांडुरंग' झाला. या पांडुरंगाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यात झाला जो महिना प्रत्यक्ष ईश्वराला प्रिय आहे. टोपण नाव 'पंढरी', 'अण्णा' असे होते.
आपल्या महाराष्ट्रात पांडुरंगाला म्हणजे विठ्ठलाला भक्त प्रेमाने 'माउली' म्हणतात. हाच मान संतात ज्ञानेश्वरांना आहे. साने गुरुजींच्या मृदू आणि मातृहृदयी असण्याचे मूळ या 'पांडुरंग' नावातच असावे.
कवी वसंत बापट म्हणतात 'कोकणातील एका कोपऱ्यात एक वासनामय, शीघ्रकोपी, मत्सरी, हटवादी, बावळा पोर जन्माला आला. पण जीवनाचे एव्हढे विराट दर्शन त्याने घेतले की, त्याच्या वासनांचा क्षय झाला. रागद्वेष ईश्वरार्पण झाले.
हटवादाचं सत्याग्रहात रुपांतर झाले आणि, या बावळ्या दिसणाऱ्या मुलातून महाराष्ट्रात अभूतपूर्व ''वाड;निष्यंद'' उसळला. चिखलातून मंद सुगंध असलेले शंभर पाकळ्यांचे कमल उमलले. बालपणीचा ''पंड्या'' मोठेपणी आधुनिक 'ज्ञानेश्वर' ठरला.
हा श्याम म्हणजेच भारतमातेचा थोर सुपुत्र, कुमारांचा गांधी, आर्तांचा मित्र, लिहिणारा, उपेक्षितांच्या आकांक्षांची घोषणा करणारा, झाडू अन लेखणी सारख्याच लालीत्याने पेलणारा, तरुणाचा मार्गदर्शक, भारतीय संस्कृतीचा मर्मज्ञ, देह आणि मन समाजार्पण करणारा क्रांतिकारी. सत्याग्रही साने गुरुजी.
'अमृतस्य पुत्र'. पंढरपुरी साऱ्यांनाच मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करणारे गुरुजी. तेव्हा अवघा महाराष्ट्र म्हणाला होता, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले. आईचं हृदय असलेला हा माणूस.. माय मनाचा बाप माणूस. गांधीहत्येचं दुःख सोसू शकला नाही.
सभोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीची पडझड पाहून अत्यंत निराश मनस्थितीत गुरुजींनी आत्मत्याग केला. पण महात्मा गांधीचे विचार जगलेले गुरुजी तुमच्या आमच्या मनात सतत जिवंत आहेत. कारण गांधीविचारांना मृत्यू नाहीच..!
गुरुजी, 'जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित.. तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे..' या तुमच्या विचारांची देशाला आज अत्यंत गरज आहे. गुरुजी,आजही तुम्ही आमच्या मनात जिवंत आहात. आपणांस वंदन.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)