संत कबीर.. माझ्या गुरुस्थानी मानलेल्या गुरुंपैकी एक. नुकतीच त्यांची जयंती झाली. जातीपातीची चढण आणि उतरंड ही जनमाणसांची कालही डोकेदुखी होती आजही आहे. हाडामासांच्या माणसांचा माणसाला 'बाट' कसा होऊ शकतो, हे इथल्या समाजव्यवस्थेचे दुखणे आहे.
एका विर्याच्या थेंबातून मानवी सृष्टीची रचना झाली तिथे कोण उच्च आणि कोण नीच..? असे खडे सवाल आपल्या दोह्यातून मांडून स्पृश-अस्पृश्यतेची सामाजिक दरी निर्माण करणाऱ्या धर्ममार्तंडांना त्यांनी डागण्या दिल्या.
संत कबीरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही. कोणी म्हणतं त्यांना तीन पत्नी होत्या व एक मुलगा होता कमाल नावाचा. डुबा वंस कबीरका उपजा पूत कमाल असा एक दोहा आहे. समाजातील अनिष्ट चाली आणि रुढी परंपराविरोधी शब्दांची तलवार चालवणारे क्रांतिकारी संत कबीर हाच त्यांचा परिचय.
संत कबीरांचा एक प्रसिद्ध दोहा..
झिनी, झिनी, झीनी, झीनी चदरिया,
दास कबीर जतन सो ओढी जस की तस...
धर धीनी चदरिया....!!
या रचनेत चादर या शब्दाचा प्रयोग
शरीरासाठी प्रतिकात्मक रुपात करण्यात आला आहे.
त्यांच्या सर्वच रचनांमध्ये गहन अर्थ आहेत.
चिटी चावल ले चली
बीच में मिल गयी दाल
कहे कबीर दो ना मिले
इक ले डाल...
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी खुष झाली.. एकावेळी तिने दोन्हीही दाणे उचलण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य झाले नाही आणि मुंगी खिन्न झाली.
एकाच वेळी दोन गोष्टी मिळत नाहीत. एक गोष्ट मिळवणासाठी दुसरी गोष्टींचा त्याग करावा लागेल. तांदळाचा दाणा मिळालेलं मुंगीचे समाधान डाळीच्या एका कणाने हिरावून घेतले.
आपलही तसंच आहे. जोवर विकल्प उपलब्ध नसतो तोवर माणूस आहे त्या गोष्टींत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले की ते आपला आनंद आणि समाधान हिरावून घेतात.
हिंदुनं की हिंदवाई देखी
तुरकन की तुरकाई
कहत कबीर सुनो भई
साधो दौड राह न पाई..
जातीपातीच्या भेदावर हे असे खडे बोल सुनवणारे कबीर क्रांतिकारक संत म्हणावे लागतील. त्यांचे अनेक दोहे समाजव्यवस्थेचा, धर्माचा बुरखा फाडणारे आहेत.
जसे की,
लाडू लावन वापसी
पुजा चढै अपार
पुजी पुजारा ले गया,
दे मुर्ती के मुही छारा..
जो पुजारी मूर्तीला नैवेद्य दाखवून स्वतःच खातो, तो खऱ्या अर्थाने देवभक्त असूच शकत नाही. गंमत पहा कबीर इतके स्पष्ट आहेत की प्रत्येक धर्मातील रुढीवर बोलतात.
हिंदु एकादशी करे चौबीसो
रोजा करे मुसलमान
पुढे म्हणतात..
ग्यारह मास किन हारै
एके महा न आना,
अर्थात हिंदु एकादशीला देवाचा दिवस मानतात, तर मुसलमान रोजाला अल्लाहचे दिवस मानतात. तर हिंदु आणि मुसलमानांनुसार एकादशी आणि रोजाचे दिवस सोडले तर इतर दिवस हे ईश्वरचे नसतात. माणसाला वैचारिकरित्या समृद्ध करणं हा कबीरांचा ध्यास होता.
हिंदु मुआ राम कहिं
मुसलमान खुदाई
कहे कबीर सो जीवता
जो दुहि न निकटी जाई
अर्थात हिंदु राम राम म्हणत मेले, मुसलमान खुदा खुदा करत गेले, जो या दोघांजवळ गेला नाही, तोच खरा शहाणा. संत कबीरांनी हिंदु मुस्लीम दोन्हीही धर्मातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढले आहेत. तरीसुद्धा हिंदु त्यांना संत मानतात, मुसलमान पीर मानतात..
हाच कबीरांच्या ऐक्य, समता, मानवता शिकविणाऱ्या विचारांचा विजय आहे, असे मानावे लागेल. हल्ली लोकांच्या आपआपल्या धर्माच्या भावना टोकदार झाल्या आहेत. बाळगा हो धर्माभिमान फक्त दुसऱ्यांच्या धर्माला तुच्छ नका मानू.. हीच विनंती. शेवटी संत कबीरांच्याच भाषेत म्हणेन,
कबीर खडा है बाजारमें
सबकी मांगे खैर
न काहू से दोस्ती
न कांहू से बैर
सर्व धर्ममार्तंडांनी फक्त एवढच लक्षात ठेवावं,
जाति न साधु की,
पुछ लिजिए ज्ञान
मोल करो तलवार का,
पडी रहन दो म्यान..!
समजतंय ना मित्रहो....!
शुभास्ते पंथान संतु..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)