संत जनाबाई म्हणजे संत नामदेवांच्या घरची दासी जनी. अखंड कष्टाची स्वामिनी असलेली जनाबाई ही एक शूद्र आणि त्यातही स्त्री म्हणून उपेक्षित.
राजाई गोणाई, अखंडित तुझे पायी ।
मज ठेवियले द्वारी, नीच म्हणो बाहेरी |
हे जनाबाईंना मान्य आहे. तरी संतांच्या सहवासात त्यांना आधार मिळाला, त्यात त्या धन्यता मानतात आणि म्हणतात, 'स्त्रीजन्म म्हणवुनी, न व्हावे उदास । साधुसंती ऐसे मज केले ।
संताच्या सहवासात जनाबाईंच्या जाणिवा प्रखर झाल्यात. विठ्ठलाच्या पायी तनमनाने त्या एकरुप होऊन गेल्या आहेत. पांडुरंगांला विनवणी करताना त्या म्हणतात,
माय मेली, बाप मेला
आता संभाळ विठ्ठला
मी तुझे गा लेकरु
मला नका अव्हेरु
मंतिमंद मी तुझी
ठाव द्यावा पायापासी
तुजविण सखे कोण
करील संरक्षण
अंत किती पाहसी देवा,
थोर भ्रम झाला जीवा
सकळ जीवाच्या जीवना,
म्हणे नारायणा....!
आता सारे भ्रम दूर झालेत.. पांडुरंगांला अंत पाहू नको ही आळवणी करतेय जना.. त्या काळात बाईने असं रस्त्यावर येऊन भजन करणं, अभंग करणं निषिद्धचं.. पण वारकरी परंपरा ही सर्वांना सामावून घेणारी परंपरा आहे.
ज्या लोकांना तत्कालीन समाजव्यवस्थेत तुच्छ लेखण्यात आलं, त्यांना वारकरी परंपरेने मायेने आपल्या पंखाखाली घेतलं. आणि त्यामुळेच जनाबाईंसारखी एखादी शूद्र स्त्री सुद्धा या परंपरेत 'संत' होऊ शकली. आज स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करणाऱ्यांसाठी संत जनाबाई प्रेरणास्रोत आहेत.
विठो घला मंदिरात,
गस्त हिंडती बाजारात...!
रांगोळी घातली गुलालाची,
शेज म्या केली पुष्पांची...!
समया जळती अर्ध्या रात्री
गळ्यामध्ये माळ मोत्यांची....!
जनाबाई पांडुरंगांमध्ये इतकी एकरुप आहे की
देव खाते, देव मी पिते,
देवावरी मी निजते,
देव देते देव घेते...!
देवासवे व्यवहारिते,
देव येथे देव तिथे
देवाविण नाही,
रिते जनी म्हणे विठाबाई,
भरुनी उरली अंर्तबाह्यी..
बघा जेवताना, झोपताना एवढेच काय काम करताना सुध्दा जनाबरोबर पांडुरंग हजर असतो. तिला पांडुरंग मदत करतात..
झाडलोट करी जनी,
केर भरी चक्रपाणी...!
जनी जाय पाणियासी,
मागे धांवे हृषिकेशी...!
पाणी रांजणात भरी,
सडासारवण करी.
म्हणजे विठ्ठल जनाबाईंच्या कणाकणात आहे. काम करताना विठ्ठलनामामुळे तिचं सारं काम सुसह्य होतय..! देवभक्तीमुळे कुणी त्यांना कांहीही म्हटल तरी ही विद्रोही संत त्या बुरसटलेल्या समाजाला सडेतोड उत्तर देतेय.
जनाबाईंच्या स्त्रीवादी जाणिवा प्रखर आहेत. स्त्रीमुक्तिच्या पाऊलखुणा रोवणा-या आहेत. कारण परंपरेचे कोणतेही बंधन न पाळता जनाबाई व्यक्त होताना दिसतात. स्त्रीच्या डोईवरील पदर म्हणजे समाजव्यवस्थेने स्त्रीवर लादलेल्या रुढीचे, बंधनाचे आणि भासमय घरंदाजपणाचे प्रतिक आहे.
तो पदर खांद्यावर घेऊन जणु जनाबाई सामाजिक संकेताना धक्के देतात.
डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी
हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा
आता मज मना कोण करी
जनी म्हणे, झाले मी वेसवा
निघाले केशवा तुझ्या घरी...!
ह्यात मला जनाबाईंचा विद्रोह दिसतो. प्रखर स्त्रीवादी जाणिव ठसठशीत अधोरेखित होते. त्यांचा हा निसंगपणा त्याकाळी जनमर्यादा तोडणारा आहे. आता ती केशवाची घरघारी झाली आहे, 'भले तुम्ही मला वेसवा म्हणा...! आता भीत नाही देवा, आदिअंत तुझा ठावा.!' असं जनाबाई म्हणतात तेव्हा त्यांची ही आत्मनिर्भरता मानवी मुक्त मनाची सर्वोच्च अवस्था आहे.
जनाबाई इतक्या विन्मुक्तपणे अभंग रचू शकल्या. वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे जातधर्म, लिंग हा भेदाभेद नाही. समाजाने ज्यांना तुच्छ लेखलं त्यांना वारकरी संप्रदायाने आपलसं केलं. जणू आई लेकरांना जवळ घेते. म्हणून जनाबाई म्हणतात,
"बायांनो, स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास.. साधुसंत ऐसे मज केले.." मी संत वाड्मयाचा जेव्हा जेव्हा धांडोळा घेते तेव्हा स्त्री-पुरुष समतेची लढाई लढताना मला संत जनाबाई बळ देतात...!
नामदेवांची ही दासी. अखेरपर्यंत त्यांची सावली होऊन राहिली. तिच्या वडिलांनी तिला तिथे कामासाठी ठेवले.. तीही आयुष्यभर नामियांची सेवा करत राहिली. इ.स. १३३० मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण त्रयोदशीला नामदेवांनी देह ठेवला. जनाई त्याचवेळी नामियाच्या पायरीवर पांडुरंगांत विलीन झाल्या.
विठ्ठल मनतेत, रुकमाई नको डाफरु..,
आलं वसतीला जनी आपलं लेकरु...!
पण जात्यावरील ओव्या, गवळणी, अभंग यांच्या रुपात आजही जनाई खेडोपाड्यातील घराघरात जागती आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)