श्री विशाल गणपती मंदिरासह 'या' १६ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू

अहमदनगर - मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता अहमदनगर येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता, तसेच अहिल्यानगर येथे ७ मे २०२३ रोजी झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता.

त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निश्चय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

तुळजाभवानी माता मंदिर बुराणनगर, शनी-मारुती मंदिर माळीवाडा, शनि-मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि-मारुती मंदिर (झेंडीगेट), तुळजाभवानी मंदिर (सबजेल चौक), श्रीगणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), श्रीराम मंदिर पवननगर (सावेडी), विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (वाणीनगर) या मंदिरांसह संपूर्ण नगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये येत्या २ महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित केले.

ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी, असे यावेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट म्हणाले. 

घनवट म्हणाले, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील देव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे.

गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथ्रेडल’ या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे.

मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही, असेही घनवट म्हणाले.

प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.

माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने अभय आगरकर आणि पंडित खरपुडे म्हणाले, 'भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. प्रभाताई भोंग म्हणाल्या, मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरांची संस्कृती, पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून येऊ नये, अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही वस्त्रसंहिता लागू करत आहोत. यासाठी श्रीकृष्ण-राधा मंदिर, सारसनगर याठिकाणी ही फलक लावत आहोत.

बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत म्हणाले, मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे असे नाही. तर ते मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होईल.

पारंपारिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक रामेश्वर भुकन यांनी केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !