'या' धरणातून शेतीसाठी पुन्हा पाणी देण्याचे लेखी आश्वासन

शेतकरी संघटनेचे उपोषण स्थगित

पुणे - भोर तालुक्यातील वरवे खुर्द धरणातून अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतीसाठी पाणी पुरवठा सुरू व्हावा, धरणातील अतिक्रमण हटवावे व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीने, जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

उपमुख्य अभियंता के. एस. पाटील यांच्या मध्यस्तीने जिल्हा जलसंधारण कार्यालयाकडून आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती उपोषणकर्ते व पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे यांनी दिली आहे.



वरवे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी धरण बांधण्यात आले आहे. गावातील पाणीवाटप संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून पाणीपुरवठा पाईपलाईन केली. मात्र निकृष्ट कामाचा दर्जा व अर्धवट काम झाल्यामुळे काही वर्षातच पाणीपुरवठा बंद पडला.

पाणीवाटप संस्थेच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झाले, पण पाणी मिळत नव्हते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे व युवा आघाडी अध्यक्ष दिलीप भोरडे यांनी दि. १९ जून २०२३ रोजी येरवडा येथील जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. 

मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता के. एस. पाटील यांनी उपोषणकर्ते व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची चर्चा घडवून आणली. आता तीन महिन्यात धरण व पाणीपुरवठा योजनेचे फेर सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार करून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव करण्यात येणार आहेत.

तलावाच्या हद्दीच्या खुणा करून अतिक्रमण निश्चित करण्यात येईल. दोषी पाणी वाटप संस्थेकडून तलाव हस्तांतरित करून काढून घेण्यात येईल आदी लेखी आश्वासने यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आली.

या चर्चेमध्ये स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, वरवे चे सरपंच निलेश भोरडे, प्रकाश बढे ,विश्वंभर भानूसे, यशवंत आथरे, ऍड. महेश गजेंद्रगडकर, अमितसिंग, नितीन भोरडे यांनी सहभाग घेतला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !