मुंबई आपल्या ताब्यात परत मिळविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली.. महाराष्ट्रभर आंदोलन झाले. चळवळी उभ्या राहिल्या. मराठी माणसाने १०६ हुतात्मे गमावले. खानदेशसह उंबरगांवची ३०० खेडी, तसेच उकई नदी आणि महत्त्वाचे म्हणजे ५६ कोटी रुपये मुंबईच्या बदल्यात गुजरातला दिले. या सगळ्याच्या बदल्यात महाराष्ट्राला मुंबई मिळाली.
१ मे १९६० रोजी मुंबई ही कायद्याने मराठी भाषेच्या एकभाषिक राज्याची राजधानी झाली. प्रबोधनकार म्हणायचे मुंबई ही फक्त मराठी माणसाची आहे. आणि म्हणून जोपर्यंत शरिरात आहे प्राण, मराठीचा ठेवा अभिमान.
महाराष्ट्र म्हणजे तत्वासाठी मागे न हटणारांचे राष्ट्र. मला अभिमान आहे माझे वडिल लोकनेते श्री. बी. आर. काका शिंदे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे एक सेनानी होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या १०६ हुतात्मांना विनम्र वंदन.
महाराष्ट्राने देशाला कितीतरी रत्नासारखी माणसं देशाला दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बलिदानाचा वारसा देणारे छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ मांसाहेब, राजर्षी शाहू महाराज साहेब, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीआई, शरद पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील.
संत दिग्गज निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत रामदास, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी.
कुसमाग्रज, वि. स. खांडेकरापासून आताच्या अरुणाताई ढेरे, गुरु ठाकूरपर्यंत.. सचिन तेंडूलकर, लतादिदी, भिमसेन जोशी, दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, आशा भोसले, हृदयनाथजी, जयंत नारळीकर.. किती माणसं सांगू..?
ही माणसं आमचा अभिमान आहेत. प्रातःकाळी स्मरणीय आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राने साहित्य, कला, शिक्षण, क्रिडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान, अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेत आपण काय योगदान काय द्यायला हवे, ह्याचे आत्मपरीक्षण करणं फारच गरजेचं आहे.
मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्रधर्म वाढवावा,
आहे तितुके जतन करावे,
पुढे आणिक मेळवावे
महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे
आपण हेच लक्षात ठेवायचं आहे,
आहे तितुके जतन करावे,
पुढे आणिक मेळवावे..
चला मग आज महाराष्ट्रधर्म पाळत महाराष्ट्राच्या नावावर आणि निश्चयांचे, पराक्रमाचे सह्याद्री घडवू.. जय जय महाराष्ट्र माझा..!
मंगल देशा ! पवित्र देशा !
महाराष्ट्र देशा..!
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा..
नाजूक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा..
वंदन तुजला
माझ्या महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिन साजरा करतात. औद्योगिक क्रांती झाल्यावर कामगारांना रोजगार मिळू लागला. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. सर्व कामगारांनी मिळून कामाचे आठ तास आणि लहान मुलांना कामाला लावण्यास बंदी.
महिला कामगांराच्या कामावर मर्यादा. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम. कायद्याने साप्ताहिक सुट्टी. कामाचा मोबदला वस्तुच्या रुपात न देता नगद द्यावा. समान कामासाठी समान वेतन, संघटना स्वातंत्र्य या कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या.
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी जगभरात १ मे हा कामगार दिन साजरा केला जातो. सन १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहलेल्या पत्रकात म्हटले होते,
कामगारा कामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटांरुचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो. कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवर जगत असतात.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटित करते. भारतात पहिला कामगार दिन १ मे १९२३ ला मद्रास शहरात पाळण्यात आला. यावेळी कामगार नेते सिंगरवेलु चेत्तीअर यांनी कामगार दिन आयोजनात पुढाकार घेतला होता. याच दिवशी सर्वप्रथम लाल बावटा वापरला होता.
सर्व महाराष्ट्राच्या परिवारातील सदस्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..! सर्व कामगार बंधूना, भगिनींना कामगार दिनानिमित्त शुभकामना.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)