जगणं जगणं म्हणजे याहून वेगळं तरी काय असावं

जिवलगांचे मृत्यू आपल्याला होरपळून टाकणारा अनुभव असतो. ती सहन केलेली होरपळ आपल्याला आपण असेपर्यंत चटके देत रहाते. एके ठिकाणी जाणं झालं. मैत्रिणीचे बाबा गेले होते. घरात जोरजोरात रडारड चालू होते. माझी मैत्रिण बाबांच्या पार्थिवाजवळ.. डोळे टक्क कोरडे..

मागे बसलेले लोक कुजबुजत होते. 'कित्ती प्रेम करत होते हिच्यावर.. पण हिच्या डोळ्यात थेंबभर पाणी नाही.' हे लोक असे कसे पटकन नित्कर्षावर येऊन पोहचतात माहित नाही. हे जगातले शहाणे आणि सगळ्यातलं सगळं आम्हांला, मला कळतं.. ह्या अविर्भावात आजूबाजूच्या सर्वांवर विषारी बाण सोडत असतात.

कोणी गेल्यावर आपण रडलोच नाही, म्हणजे गेलेल्याबद्दल आपल्याला प्रेमच नव्हतं... आदरच नव्हता, असे अनुमान काढणे म्हणजे तद्दन मुर्खपणा आहे. आयुष्य प्रवाही आहे... ते पुढे पुढे वहात जाणार ही अपरिहार्यता समजून घेतली पाहिजे. या प्रवाहाच्या वाटेत लागणारे मैलाचे दगड मागे टाकूनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. मग तो मैलाचा दगड आपल्या हृदयातील परमेश्वर का असेना.

बायकांकडून मी बऱ्याचदा ऐकते. सवाष्ण मरण भाग्याचं. एकतर नवऱ्यापेक्षा बायको लहानच हवी, असा एक पुरुषसत्ताक मानसिकतेचा समज. नवरा मेला की हिनं शृंगाराचा, रंगाचा त्याग करायचा, ह्या मुर्ख समजूती अजूनही समाजात टिकून आहेत. अगदी सुशिक्षित स्त्रियांही याच्या आहारी गेलेल्या दिसतात.

पूर्वी तर वयस्कर पुरुषांशी छोट्या छोट्या मुलींचे विवाह लावण्यात येत. मग तो माणूस गेला की या छोट्या कळ्या रडत.. ओरडत चितेवर सक्तीने चढवल्या जात.. काय होत असेल त्यांचं... या कल्पनेनेसुध्दा शहारायला होतं.

वेगळे जन्मलो आहोत तर वेगळेच मरणार ना.? मी सवाष्णचं गेलं पाहिजे, हा अट्टाहास म्हणजे पुरुषसत्ताक पध्दतीने स्त्रीला गुलाम करण्यासाठी केलेले वर्षानुवर्षांचे षड् यंत्रच आहे. समतेने पतीपत्नींनी मित्रमैत्रिण होऊन संसार करावा. एकमेकांचा आत्मसन्मान जपत हसत खेळत जगावं. तसाच एकमेकांचा मृत्यूही शांतपणे जगावा.

माझे बाबा एकदा म्हणाले होते, "गेलेल्यांच्या आठवणींतून कधीच बाहेर यायचं नसतं, तर आपलं सारं आयुष्य गेलेल्यांच्या आठवणींबरोबर जगायला शिकायचं होतं " आपल्या माणसांचे मृत्यू समंजसपणे स्विकारण्यासाठी मन आणि बुध्दी उजळवत न्यावी लागते.

खरतर ही तपश्चर्याच आहे. जमवावंच लागतं. कारण जे मागे जिवंत आहेत त्यांच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य, प्रेम, माया आपल्याला आपल्या भूमिकेची जाणिव करुन देत असते. आणि मागच्यांच्यासाठी आपलं भानावर असणं हे आवश्यकच असतं ना.!

एक गृहस्थ आपल्या वीस वर्षापूर्वी वारलेल्या आईंच्या साड्या टाकून देत नाही.. मी म्हणेल ती पूर्व दिशा असा स्वभाव असणाऱ्या या गृहस्थाला कोण सांगणार की वस्तूत प्रेम नसतं. ते आपल्या मनात जागवतं ठेवायचं असतं. मनानं मोकळपण घेत विशालपण घेऊन जगता आलं पाहिजे.

सतत माझं घर, हे माझं, ते माझं, असं म्हणणाऱ्या आपल्या मनातल्या अवलंबनाला निरोप देता आला पाहिजे. अशा गोष्टीतून ठराविक वयोमर्यादेनंतर मोकळं होता आलं पाहिजे. जगणं जगणं म्हणजे तरी काय वेगळं असावं याहून..?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !