अहमदनगर - जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना कोपनहेगन, डेन्मार्क येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करत असते. या पुरस्काराच्या मानांकन यादीत अहमदनगर शहरातील गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा पोहचली आहे.
यावर्षीचा पुरस्कार्थी संस्था ठरविण्यासाठी जगभरातून ऑनलाईन वोटिंग सुरु झाले असून, लंगर सेवेच्या सामाजिक कार्यास वोटिंग करण्याचे आवाहन गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. डेन्मार्क येथून मागील अकरा वर्षापासून जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक योगदान देणार्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरु झालेल्या लंगर सेवेने तब्बल तीन वर्ष लाखो भुकेल्यांना दोन वेळचे निशुल्क जेवण पुरविण्याचे कार्य केले. आजही लंगर सेवेची अन्न छत्रालय सुरु आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराच्या निवड समितीने लंगर सेवेला अन्न श्रेणीत अंतिम पुरस्कार्थींच्या यादीत स्थान दिले आहे.
डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्था जगभरातील पाणी, हवा आणि अन्न सुरक्षेसाठी कार्य करणार्यांना पुरस्काराने सन्मानित करत असते. 2.7 अब्ज लोक दारिद्रयरेषेखाली राहतात, 850 दशलक्ष लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आणि 828 दशलक्ष कुपोषित आहेत. भूक भागवणारे अन्न निर्माण करण्याची पृथ्वीची क्षमता नाही. ही जागतिक आव्हाने स्थानिक उपायांनी सोडवता येतात.
या संस्थेचे ध्येय जगभरातील पाणी, हवा आणि अन्न क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य ओळखणे आणि ते जगा समोर ठेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे. यावर्षी अन्न श्रेणीत केनिया, भारत, झांबिया, नायजेरिया या चार देशातील संस्था असून, यामध्ये घर घर लंगर सेवा भारतातून निवडण्यात आली आहे. कोरोना काळात लंगर सेवेच्या कार्य व योगदानाने डब्ल्यू,ए.एफ.ए. प्रभावित झाली असून, हे कार्य इतरांसाठी आशेचा संदेश ठरणार आहे.