शंभर वर्षांपूर्वी दारी आलेल्या ज्योतिषाला बहिणाबाई सांगतात,
नको नको ज्योतिषा,
माझ्या दारी नको येऊ..
माझे दैव मला कळे,
माझा हात नको पाहू..!
धनरेषांच्या चऱ्यांनी,
तळहात रे फाटला..
देवा तुझ्याबी घरचा,
झरा धनाचा आटला..!
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह
तळहाताच्या रेघोट्या..
बाप्पा मारु नको थापा,
अशा उगा खऱ्या खोट्या..!
कष्टांवर, प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणारे हे आमचे आदर्श. आणि विज्ञानासाठी आयुष्य खर्ची घालणारे संशोधक, सारासार विचार करणारी विज्ञाननिष्ठ डोळस सामाजिक नेतृत्व.
कुठं चाललोय आपण, विमानाची पूजा करुन लिंबू मिरची बांधतो.. त्याने आपण सुरक्षित होतो का.? एवढा भयानक रोग दाराशी ठाकला, तो माणसामाणसांत पोहचला.. किती जिव्हाळ्याची माणसं न बोलता, न भेटता, शेवटचा निरोपही न घेता निघून गेली.
मग या शास्त्राने आम्हा पामरांना 'का' जागं केलं नाही.?
बहिणाबाईंच्या आधी
चारशे वर्षापूर्वी आमचे
तुकाराम महाराज सांगून गेले..
सांगो जाणती शकुन,
भूतभविष्य जाणं
जे आम्हाला सांगतात
आम्हांला शुभाशुभ कळते,
भूतभविष्यवर्तमान कळते,
हे ऐकायलाही आम्हाला आवडतं नाही.
त्यांना दाराशी उभं करावसं वाटतं नाही..
ज्योतिषी असंही सांगतात,
रिध्दीसिध्दीचे साधक,
वाचसिध्द होती एक..!
त्यांना तुकाराम महाराज म्हणतात..
तुका म्हणे जाती,
पुण्यक्षये अधोगती..!
म्हणजे असे ज्ञान आहे,
असं फुशारक्या मारणारे अधोगतिला जातात हे निश्चित.!
जगण्याकडे डोळस आणि जाणतेपणाने जगायला शिकवणारी माणसं, ह्यांचे धडे आपण नव्या पिढीला देणार आहोत की परत आदिमकाळांकडे नेणार आहोत, हे शिकल्यासवरल्या माणसांनी ठरवावं.!
खरं ना मंडळी, आता अभ्यासक्रमात डार्विनचे सिध्दांत नसणार, हे ऐकून मन ढवळून गेले.. पुढच्या पिढीची काळजी वाटून राहिली बाबा...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)