नातं परिपक्व असणं म्हणजे प्रेम असतं का.? मागे सतत चॅनलवर अमिर खान आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीवर चवितचर्वण, फालतू जोक्स, वेगवेगळे खास तयार केलेले जोक्स दिसत होते. अक्षरशः उबग आला ते पाहून.
बरं त्यांनी जाहिरपणे आम्ही परस्पर संमतीने वेगळं होत आहोत, असं सांगूनही नंतर असं का घडलं ? या चर्चांना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला, पण झालं उलटंच. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्याचे वाभाडे काढणे, हा काही लोकांचा छंद असतो. सोशल मिडियावर तर जास्तच.
सेलिब्रिटी असले म्हणून काय झालं, आपल्याला अधिकार आहे कुणाच्याही घरात डोकावून पहाण्याचा..? कित्तीतरी लोक लग्नाआधी एकमेकांवर जीव टाकत असतात, एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी असते.. ते प्रेम असतं. कारण नंतर एकमेकांचे कमजोर किनारे ओरबाडून काढले जातात.
त्या मंतरलेल्या रात्री, छळाच्या रात्री म्हणून कोर्टात उघड्या वाघड्या होतात. मग घरात चोवीस तास एकत्र असणारी ही माणसं एकमेकांच्या मनात पोहचलेली नसतात का ?
काही नवीनच भेटलेली माणसं आपल्या मनाचे असंख्य दरवाजे ओंलाडत मनाच्या तळाशी पोहचतातच की. जवळ असलेली ही माणसं एकमेकांपासून कोसो दूर जातात. एकाच्या मनातल्या वादळांची दुसऱ्याला साधी कल्पना येत नसावी.?
वेगळं होण्याची असंख्य कारणं असतात. कधी जोडीदाराला गृहित धरणं, परस्परांशी अवाजवी अपेक्षा करणं, जोडीदाराची इतरांसोबत तुलना करणं, एकमेकांसोबत मेळ न बसणं.. अशा कितीतरी शक्यता.
सुरवात बरोबरीने चालण्याच्या स्वप्नाने होते. मग एकाची पावले मंद का होत असावीत.? सोबतीने स्वप्न पाहणारे डोळे अनोळखी होऊन जातात. तेव्हा अशावेळी थोडं दूर होऊन विरहाच्या अनुभवातून जाताना समोरच्यापेक्षा आपलं काय चुकलं, याचा बोध घ्यायला हवा.
आणि ही नाईलाजाची नाती सांभाळत बसण्यापेक्षा एकमेकांचा ग्रेसफुली निरोप घेणं केव्हाही चांगलं ना..! 'आकर्षण' आणि 'समजून घेणं', यातील अंतर दोघांनाही कळून घ्यायची गरज असते. हे अपेक्षाभंगाचे खत घातल्यावरच माणूस नावाचं झाड परिपक्व होत असावं.
कारण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, हे लग्नाच्या वेळी जगाला ओरडून सांगणारी मंडळी, त्याच ठामपणे एकमेकांसोबत जगू शकणार नाही, या परिस्थितीवर येतात.
प्रथम 'माणूस' आपल्याला खराच कळलाय, या गैरसमजातून आणि प्रत्यक्ष एकत्र रहाताना आलेला अनुभव, यातून माणूस हादरुन जातो. आणि ही प्रेमाची वीण उसवत जाते.
राजन खान सर एके ठिकाणी म्हणतात, प्रेम असेल तर प्रेमभंग होत नाहीच. व्यक्ती दूर गेली की प्रेम संपत का ? प्रेमात व्यक्ति महत्वाची नसतेच. महत्त्वाचे असते ते मन, मनातल्या त्या व्यक्तिबद्दलच्या भावना. सर्वच भावना आस्था, ओढ, वासना, राग, किळस, सगळ्याचं भावना.
व्यक्ती आयुष्यात असतानाही त्याच भावना असतात. गेल्यावरही याच भावना असतात मनाच्या कोपऱ्यात कुठतरी राहून जातात अंतापर्यंत. ज्याचा भंग होतो ते मुळी प्रेम नसतचं. अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळ कारण.
आपल्याला समजून घेणं आणि स्विकारणं आलं पाहिजे. समोरच्याला गुणादोषांसकट स्विकारता आलं पाहिजे. उगाचच एकत्र रहाण्याचे सामाजिक संकेत, पुष्कळदा मागे फिरता येत नाही म्हणून नाईलाजाने केलेला सहप्रवास, अशा अगतिकतेत आयुष्य निघून जातं. रहाते ती जगण्याची वेदना..!
दोघांचे इतक्या महत्वाच्या विषयावर एकमत होते. शांतपणे काही एकमेकांपासून दूर होतात. यात वाहून जाण्याआधी आपल्याला आवडणारं माणूस कुठल्या कुठल्या संदर्भाच्या संस्कारात मोठं झालंय, याचा विचारच केलेला नसतो आपण.
'पूर्ण ओळखले', या फोल दाव्यानिशी दोन आयुष्य उध्वस्त होत जातात. मागे जाऊन भूतकाळ पुसता येत नाही, पुढे जाऊन भविष्य जाणता येत नाही. या असहाय दुबळेपणाला वर्तमान म्हणतात. हे नवरा-बायकोचे नाते एवढे का अनोळखी होऊन जाते, याचा पुनर्शोध घ्यायला हवा. होय ना..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)