अहमदनगर - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महामानव, बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महामानव महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महामानवांची विचारधारा सातत्याने जनमाणसांत रुजावी या अनुषंगाने संयुक्त सार्वजनिक जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता घोडेगांव ग्रामपंचायत समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास व कार्यालयातील प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
यावेळी गावातील प्रमुख मान्यवर व भीमसैनिक व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगांव यांचेकडून जयंतीनिमित्त आलेल्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना सरबत व थंड पाण्याचे आयोजन करण्यात आले.
दुपारी १ वाजता जयंतीचे औचित्य साधून घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्र या ठिकाणी तेथील निराधार मुलांना गोड जेवण देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. हा कार्यक्रम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला.
दुपारी ३ वाजता महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधनपर कार्यक्रम सर्वच ग्रामस्थ, भीमासैनिक, शिवसैनिक व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सायंकाळी ५ वाजता घोडेगांव चौफुला येथे प्रमुख मान्यवर सुनिताताई गडाख यांच्या हस्ते प्रतिमेस अभिवादन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर मोठ्या जल्लोषात जयंतीची सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व ग्रामस्थ, तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व महापुरुषांच्या विचारांचे पाईक असणारे त्यांचे अनुयायी, भीमसैनिक, शिवसैनिक, गावातीलही सर्वच प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती मिरवणूक उत्साहात पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासाठी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी व सर्व स्टाफचे विशेष सहकार्य लाभले. तसेच यात्रा कमिटीचे सहकार्य लाभले.
ग्रामदैवत आई घोडेश्वरी देवींची यात्रा संपलेली असताना, यात्रेनिमित्त संपूर्ण गावात केलेली विद्युत रोषनाई यावेळी खास जयंतीमुळे तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीत आणखी शोभा वाढली होती.