सव्वा तीन लाखांचे मोबाईल जप्त
सायबर व एलसीबी पोलिसांची कामगिरी
अहमदनगर - चोरीचे मोबाईल नविन असल्याचे भासवून त्यांची विक्री करणारे रॅकेट उजेडात झाले आहे. एका चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे. या कारवाईत ६ मोबाईल शॉपीचालकांना जेरबंद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी दिंगबर शंकरसिंग परदेशी (पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यांच्याकडे शासकिय कामकाजाकरिता असलेला सॅमसंग कंपनीचा ए २० मोबाईल हा कोणीतरी गर्दीचा फायदा घेवुन चोरुन नेला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करन्याच्या सुचना दिल्या.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेर व फौजदार प्रतिक कोळी, पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर, राहुल हुसळे, पोलिस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, निळकंट कारखेले, पोलिस कॉन्स्टेबल अरुण सांगळे, यांच्यासह सविता खताळ, पुजा भांगरे, चालक वासुदेव शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, मच्छिंद्र बर्डे यांचे पथकाने तांत्रिक विश्लेषण करून तपास केला.
हा मोबाईल पोपट सुहास जगधने (रा. कुंभेफळ, ता. आष्टी, जि. बीड) याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोपट हा धानोरा येथे ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चोरी गेलेला मोबाईल आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हा मोबाईल अमोल होळकर (रा. धानोरा, ता आष्टी, जि.बीड) याचे समर्थ मोबाईल शॉपी दुकानातुन घेतल्याचे सांगितले.
अमोल होळकर याचेकडे चौकशी केली असता त्याने हा मोबाईल महेश कर्डिले (रा चिंचोली, ता. आष्टी, जि. बीड) याचेकडुन घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे महेश कर्डिलेला ताब्यात घेवुन अधिक विचारपुस करता त्याने मोबाईल अमोल होळकरला दिल्याची कबुली दिली. अन येथेच मोठे रॅकेट उजेडात आले. महेशने इतरही ओळखीच्या मोबाईल शॉपीमध्ये चोरीचे मोबाईल विक्रीसाठी दिले होते.
त्यात नागनाथ कारभारी जाधव यांची साईनाथ मोबाईल शॉपी (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड), मनिष पैलाज माणिक (रा. अहमदनगर यांची माणिक मोबाईल शॉपी, दिल्लीगेट), शैलेश बाळकृष्ण लाटणे यांची किरण मोबाईल शॉपी (रा. आदर्शनगर, कल्याण रोड, अहमदनगर), आजिनाथ महादेव वायभासे यांची जय गणेश मोबाईल शॉपी (रा. शिंगणापुर रोड, सोनई), यांचा समावेश होता.
त्यांना काही चोरीचे मोबाईल विकलेले व विक्रीकरता दिलेले असल्याचे सांगुन हे मोबाईल झहीद सय्यद खलीद (रा. मुकुंदनगर) याचेकडुन घेतल्याचे सांगितले. त्यावर या सर्वांच्या ताब्यातुन ३ लाख २४ हजार रुपयांचे एकुण २७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व मोबाईल कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.