काल एक बच्चनजींचा व्हिडीओ पाहिला. अतिशय सुरेख संदेश देणारा.. यावरुन मला बाबांनी फार पूर्वी एक गोष्ट सांगितली होती, ती आठवली..
एक मुर्तिकार मुर्ती घडवत असतो. हुबेहूब एक तयार मुर्ती तिथे असतेच. एक पांथस्थ तिथून जात असतो, तो त्या मुर्तिकाराला विचारतो, "एक सारख्या दोन मुर्ती का घडविल्या आहेत...? कोण घेणार ह्या दोन मुर्ती ?"
मुर्तिकार म्हणतो, "ही पहिली मुर्ती आहे ना, ती थोडीशी बिघडली आहे, म्हणूनच करतोय. पहिल्या मुर्तिच्या गालावरील तिळाएवढा टवका माझ्याकडून निघाला आहे. मी ही बिघडलेली मुर्ती राजाला कशी देऊ..?"
पांथस्थ पहिल्या मुर्तीच्या जवळ जाऊन निरखून पहातो अन् हसू लागतो, "अहो दादा, हा इवलासा टवका कोणालाही ओळखू येणार नाही, द्या तशीच धाडून.. उगाचच दमताय तुम्ही..!" मुर्तिकार मंद हसत म्हणाला, "दादा, मलाही माहित आहे कुणालाच कळणार नाही, पण मी कधीच खोटं वागलो नाही, अन वागणार नाही..!"
ही कथा सांगताना बाबा म्हणाले, आपण दुसऱ्यांशी लाख खोटं वागू शकतो, बोलू शकतो पण रात्री झोपताना सत्कर्माचं फळ असतं ना.. ते समाधानाची भाकरी आणि झोप देतं..!
फक्त मोठ्यांच्या सहवासातील मला मिळालेला आनंद तुम्हा सर्वापर्यंत पोहचवते आहे. मी लहान असताना वत्कृत्व स्पर्धेत दुसरी आले तेव्हा पहिल्याच नंबरची सवय असलेल्या मला वाईट वाटून मी रडले.
तेव्हा बाबा म्हणाले होते, जगात तुमच्यापेक्षा बुध्दीमान, अभ्यासू खूप जण असतात. नंबराच्या स्पर्धेपेक्षा आपला सहभाग किती उत्तम होता, याचा विचार करायचा. या शिकवणुकीने माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले.
मागच्या पिढीची धरोहर मी फक्त पुढे नेतेय. म्हणजे आपण फक्त पालखीचे भोई.. म. गांधीनी म्हणलेलंच आहे, तू काय करतेस हे बोलायची गरज नाहीच, ते दिसतंच राहिल. तुम्हा सर्वांच्याच प्रेमात सदैव राहू इच्छिणारी. तुमचीच.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)