आलोच. पाच मिनिटांत पोहोचतोय मी. तोच ना आपला समुद्र किनारा..? हां यार, आपलं तेच ते ठिकाण. तुला आठवतं आपली अशीच बस स्टॉपवर ओळख झाली होती. मी त्या दिवशी उपाशी आहे तुला कसं कळलं काय माहित, आणि तू मला पोटभर जेवू घातलंस.
आणि तिथून आपली नकळत नाळ जुळत गेली ती कायमचीच. नंतर प्रत्येक सुखदुःखात तू पाठीशी राहिलास. वाढत जाणाऱ्या व्हर्च्युअल जगात तू एकमेव एक्चुअल फ्रेंड आहेस. तुझ्याकडून लाखो गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
आईसारखं मन, बहिणीच्या काळजाची माया, भावासारखं प्रेम करणारा तू, बायकोच्या मनातला हक्क सगळं काही तुझ्यात आहे. केवढा तो चांगुलपणा घेऊन तू जन्मलास मित्रा. खूप कमी गोष्टी माझ्याकडे आहेत, पण तू मित्र आहेस ही अभिमानाची गोष्ट माझ्याकडे आज आहे.
तु बरंच काही आहेस माझ्यासाठी. तुझी आयुष्याबद्दलची कमालीची समज, कितीही दुःख सहन करून, जराही कडवट न बनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्या, घात करणाऱ्या सोबत्यांनाही मदत करणारा क्षमाशील तु.
कशाचा लोभ नाही, असूया नाही. कुणाच्या मनात तुझ्याबद्दल कटुता नाही. गरिबीचे भांडवल नाही, सच्चेपणा, साधेपणा, सरळ सरळ राहिलास आणि वागलास. मोठा झाला तरी पाय जमिनीवरच आहेत रे. कुठल्या मिट्टीचा बनलास तू यार..
सर्व मित्राचं कल्याण व्हावं, म्हणून झटणारा तु. हळवं मन, सगळंच जग चांगलंय, असं समजणारा तुझा भाबडा स्वभाव. खरंच प्रत्येक भल्या बुऱ्या अनुभवांना मनापासून भिडणारा तु. खरंच तुझ्या मैत्रीने गंजलेले क्षण सोन्याचे बनवलेस तु मित्रा.
आज दहा वर्षांनी आपण भेटतोय, पण जसा आहेस तसाच आहेस. आजही तुझे विचार, मुल्य, आपुलकी, प्रेम तेवढेच आहे. आजही तेव्हाचा तुझ्यासाठी अर्थपूर्ण शब्द तोच आहे. जो एका शब्दाने कोसो दूर असूनही काळजात घर करतो तो. लव्ह यु. लव्ह यू मित्रा..!
- छाया रसाळ (अहमदनगर)