व्हाट्स अप व सोशल मीडिया ग्रुप अडमिनला पोलिसांची जाहीर नोटीस
अहमदनगर - दिनांक २२ एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यात रमजान ईद, अक्षय्य तृतीया सण उत्साहात साजरे होणार आहेत. हे उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावेत, यासाठी सायबर पोलिसांनी व्हाट्स अप ग्रुपचे अडमिनला सूचना व नोटिसा जारी केल्या आहेत.
या नोटिशीत म्हटले आहे की, 'सोशल मिडीया', जसे की, What'sApp, Facebook, Instagram, Twitter इत्यादी माध्यमातुन आक्षेपार्ह मजकुर टाकणाऱ्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे.
समाज कंटकाकडुन सोशल मिडियाचे माध्यमातुन चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात. त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मिडियावर वॉच राहणार असुन अफवा पसरविणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उत्सव प्रसंगी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, अफवा, खोट्या बातम्या प्रसारीत करुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अशा समाजकंटकाविरुध्द पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कारवाई यापुर्वी करण्यात आलेली आहे. आता रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव शांततेत व सुव्यस्थेत पार पाडण्याचे दृष्टिकोनातून आपण आपले ग्रुपचे अॅडमिन असल्यास What'sApp ला Only Admin Can Send Massage असे सेटिंग करावी.
आपले ग्रुप वरुन कोणत्याही प्रकारची अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा मजकुर प्रसारित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा इशारा सायबर पोलिसांनी बजावलेल्या नोटीस मध्ये देण्यात आलेला आहे.
या सुचनांकडे दुर्लक्ष करुन रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव प्रसंगी आपले ग्रुपचे सदस्यांकडुन कोणत्याही प्रकारची अफवा पसरविली, जातीय तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह संदेश प्रसारीत केल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी ग्रुप अडमिन व संबंधित व्यक्तीस (मेसेज प्रसारित करणारा) जबाबदार धरण्यात येईल.
संबधिताविरुध्द कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणुन सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सायबर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी नोटिशीत म्हटले आहे.