जागतिक चिमणी दिन विशेष
हाऊस स्पॅरो अर्थात 'चिमणी' हा केवळ मानवी सहवासातच राहु शकणारा पक्षी. पर्यावरणात त्याचे महत्वाचे स्थान. पण सातत्याने घटत जाणारी त्यांची संख्या लक्षात घेता 'जागतिक चिमणी दिना' निमित्त त्यांवर विचारमंथन व उपाययोजनात्मक कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे.
निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहातर्फे पक्षीप्रजाती व त्यांच्या संख्येवर जिल्हाव्यापी अभ्यास 'पक्षीगणना' या उपक्रमाच्या माध्यमातुन १४ वर्षांपासुन सातत्याने केला जात आहे.
असा सातत्यपुर्वक अभ्यास करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. ही नगरकरांसाठी आनंदाची बाब आहे. त्यांच्या टिमने केलेल्या सातत्यपुर्वक निरीक्षण नोंदींवरून चिमण्यांच्या सरासरी प्रमाणात दरवर्षी चिंताजनक घट झाल्याचे दिसुन आली.
उपाययोजनात्मक कार्यवाहीसाठी गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या समुहामार्फत जिल्हाभरात चिमणीसंवर्धन उपक्रम हाती घेतला गेला. त्यानुसार त्यांच्यामार्फत जिल्ह्यात दरवर्षी अल्पदरात शेकडो कृञीम घरटी व बर्ड फिडर पुरवले जातात.
निसर्गप्रेमी नागरिक असे बर्डफिडर आपल्या अंगणात, बागेत अगर परिसरात बसवून चिमणी संवर्धनास मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातुन चिमण्यांच्या संख्येमध्ये सकारात्मक वाढ झाल्याचेही दिसुन येत आहे.
सात वर्षांची चिमण्यांची आकडेवारी
साल सरासरी प्रमाण
२०१५- ३३.७३
२०१६- ३२.९९
२०१७- २६.०५
२०१८- २२.१३
२०१९- २१.१२
२०२१ - २२.००
२०२२- २३.०५
२०२३- २५.००
हे प्रमाण पाहिले की चिमण्यांच्या घटत चाललेल्या संख्येवर प्रत्येक निसर्गप्रेमीने आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे असल्याने आपल्या अंगणात, परिसरात बर्डफिडर व कृञीम घरटे बसवण्यासाठी 9604074796 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन निसर्गप्रेमी समुहातर्फे करण्यात येत आहे.
चिमणी व तत्सम धान्य व किड खाण्यारे व थव्याने राहणारे पक्षी हे अन्नसाखळीत प्राथमिक स्तरावर येतात. इतरांच्या तुलनेत त्यांची संख्या जास्त असते. त्यानंतर त्यांवर जगणारे शिकारी पशु- पक्षांच्या प्रजातींची संख्या क्रमाक्रमाने कमी होत जाते.
पक्षीजीवनावरच किटकजीवन, वनस्पतीजीवन व परिणामी प्राणीजीवन निगडीत असते. म्हणुनच पक्षीजीवन ही निसर्ग संतुलनातील सर्वात महत्वाची पायरी ठरते. पक्षांचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे.
त्यातही चिमणी हा पक्षी शेतीपिकांसाठी नैसर्गिक किडनाशकाचे कार्य करणारा असल्याने अधिक महत्वाचा आहे. परंतु सध्या आधुनिकीकरण या नावाखाली निसर्गाचे सर्वात मोठे हनन सुरू आहे. आपल्या सहवासात निवास करणार्या चिमण्यांची घटत चाललेली संख्या या हानीचेच प्रमाणपञ आहे.
सिमेंटच्या जंगलांमध्ये वळचणींच्या जागेचा अभाव, वृक्षतोड, अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष, शेतीपिकांवर होणारा किटकनाशकांचा वाढता वापर व मोबाईल टाॅवरचे तरंग असे अनेक कारणे यामागे सांगता येतील.
शहरातुन तर चिमण्या जवळ जवळ हद्दपारच झाल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक जुने वाडे व मातीच्या गढी अखेरच्या घटका मोजत आहेत. हे वाडे व गढी दरवर्षी शेकडो चिमण्यांना निवासस्थाने उपलब्ध करून त्यांची पैदास करण्यासाठी हातभार लावतात.
दौलावडगावचा भव्य वाडा व करंजी गावाच्या मधोमध उभी असलेली मातीची भव्य गढी या ग्रामीण भागात काही कारणांनी चिमण्या दिसत असल्या तरी त्यांचे प्रमाणात तिथेही घटच झाल्याचे दिसुन येत आहे.
निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संवर्धन समुहातर्फे "एक मुठ धान्य-एक ओंजळ पाणी"हे अभियान राबवुन त्याद्वारे पशुपक्षांना अन्न पाण्याची सोय केली जात आहे. मागील ३ वर्षी या टिमने दहा हजारांहुन अधिक मातीच्या पसरट भांड्यांचे वाटप जिल्हाभर केले आहे.
- जयराम सातपुते, निसर्ग अभ्यासक.
(जिल्हाध्यक्ष, निसर्गप्रेमी संघटना, अ. नगर)