झाला एकदाचा महिला दिन. गाजावाजा करत सूप वाजल बै एकदाचं. काय काय झालं या दिवशी.? हॉटेलमध्ये सूट, कोस्मेटिकवर सूट, महिलांचे ड्रेस आणि इतर खरेदीवर सूट, कंपन्यांमध्ये महिलांना चॉकलेट आणि केक देणे आणि आई-बहीण-बायकोच्या त्यागाचा गौरव करणारे स्टेटस ठेवणे, हेच आजच्या महिला दिनाचं स्वरूप दिसतं.
महिला दिन यासाठी नाही. महिला दिन म्हणजे बैलपोळा नाही, की एक दिवस सजून-धजून कौतुक करून घ्यावं आणि इतर दिवशी दुय्यमत्वाचं जीवन जगावं. आता 'महिला दिन'च पुरुषांकडून 'हायजॅक' होताना दिसतोय.
काय आहे महिला दिन.? महिला दिन हा महिलांच्या संघर्षाचा दिवस आहे. १० तासांचा कामाचा दिवस, मतदानाचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार मिळवण्यासाठी ज्या हजारो महिला एकोणीसाव्या शतकात लढल्या, त्यांच्या संघर्षाला पुढे नेण्याचा दिवस आहे.
हा इतिहास लोकांपुढे मांडत आणि महिला दिनाच्या बाजारीकरणाला विरोध करायला हवाच. कोणी मला म्हणेल साजरा तर व्हायलाच हवा. हं. करा साजरा, पण आदर्शाच्या मखरात बसू नका ग बायांनो...!
"मी नच रे केवळ मादी, मी माणूस ग आधी..", हे सतत स्वतःला सांगत रहा. मुलींनो.. पौराणिक काळ पहा, ऐतिहासिक काळ पहा, भूतकाळ पहा. स्त्रीला सतत संघर्ष करावा लागला आहे..
आपलं माणूसपण सिध्द करण्याचा संघर्ष, आपले आणि आपल्या मुलांचे हक्क मिळविण्यासाठी केलेला संघर्ष. तिचं जीवनच एक संघर्ष असते. माझ्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे स्त्रीचा संघर्ष.
या संघर्षात ती फुलते, उमलते, तिचे आणि इतरांचे जीवन बहरवते. आणि मानवी जीवन आणि मानवी समाज समृद्ध करते. आपल्या अविरत संघर्षाने जीवन आणि समाज कायमचा समृद्ध करते.
आपल्या अविरत संघर्षाने जीवन आणि मानवी समाज सुंदर आणि सदाबहार करणाऱ्या माझ्या सख्यांना, त्यांच्या संघटनांना आणि स्त्रीयांच्या या संघर्षात स्त्रीच्या बरोबर ठामपणे उभं राहत पुढे येण्यासाठी सोबत करणाऱ्या सर्व पुरुषमित्रांना, स्त्री सख्यांना, सहकारी, कुंटुबीय, यांना आपण माणूस होण्याच्या शुभेच्छा देऊ शकू.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)