आपण पुढे चालायचं असतं.. बेधडक, बेभानपणे. काही चांगलं निर्माण करण्यासाठी..

प्रत्येकाची जगाकडे पहायची दृष्टी वेगवेगळी असते. काही आपल्या रुबाबात रहातात. फारसे मिसळत नाहीत कुणात. काहींना लोकांमधे मिसळायला आवडतं.. त्यांना माणसे हवी असतात. काहींना फक्त आपलं कुटुंब. हा स्वभाव असतो..

प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने आयुष्य आनंदी जगण्याचा प्रयत्न करीत असतो. सार्वजनिक आनंद देखील आयुष्याचा भाग असतो आपल्या. तिथे मिसळायचं असतं.. आनंद वाटायचा असतो.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जगण्याची भाषा कळायला हवी. नाहीतर आपल्या सोबत असणारी माणसे देखील इथे खेळ कसा होईल, या प्रतीक्षेत असतात. त्यात देखील अनेकांचा आनंद दडलेला असतो. असुरी आनंद.

एखादी चांगली गोष्ट उध्वस्त कशी करता येईल.. त्याचा खेळ खंडोबा कसा होईल, असे अनुभव तर प्रत्येकाच्या जीवनात येत असतील. पण ही माणसे आपली असतात. नाही स्वीकारू शकत आपणं की ती असे काही करू शकतील.

काही तर नामवंतांच्या मांदियाळीतील. पण माणूस म्हणून खालच्या पातळीतील. भले लोक यांना मुजरा करतील, त्यांचं कौतुक करतील. पण जेव्हा यांच्या सहवासात आपणं येत असतो तेव्हा समजू लागतं यांचं खर रूप.

मी ही असे अनुभव घेत असतो. हसू येतं. काहींचा स्वभावच मुळी कारस्थानी असतो. नाही समजू शकत आपल्याला. जेव्हा कुणीतरी दुसरा येऊन सांगतो खरखुरं. त्यांचे इरादे.. तेव्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत असतो मी ही..

पण हिम्मत होत नाही यांना विचारायची. नको वाटतं, आपण यांचे इरादे यांच्यापुढे उघड केल्यावर काय वाटेल त्यांना..?आपणच डोळे मिटून घ्यायचे. मनात म्हणायचं त्याचं त्याला लखलाभ. तुम्ही कितीही मोठे व्हा. तुमच्यातील माणूसपण महत्वाचं. ती तुमची ओळख.

आमच्या इथे एक राजकारणी आहे. पक्षाने त्याला पदही दिलं आहे. पण दुर्दैव असं की त्याला कुणाचं काही भलं झालं, किंवा त्याला अमुक अमुक विषयात चांगला फायदा झाला हे सांगितलं की, त्याचं तोंडच उतरतं. आता काय करावं या प्रवृत्तीला. अन् ही माणसे निघाली समाजाचं भलं करायला..


रसिक ग्रुपला देखील असे अनेक अनुभव आहेत.  एकवीस वर्षात गुढीपाडवा सांस्कृतीक महोत्सवाच्या व्यासपीठाने ज्या आमच्यातील काही मित्रांना उंची दिली. अभिमानाने मान दिला. त्यांनाच नंतर या व्यासपीठाची वाढलेली ऊंची खपायला लागली. 

वाढलेली प्रतिष्ठा पाहून कदाचित त्रास ही व्हायला लागला. मग झाली कारस्थाने सुरु, याच्या त्याच्या मार्फत. फार पुढे न येता छुपे डावपेच चालु झाली. आतून सगळे उद्योग यांचे.।त्यावेळी आम्हालाही कळायचं नाही की का होतय असं..

याचा मुकाबला करायला आम्हीही मग नाईलाजाने तयार. आमची ताकद फक्त एकच. ती म्हणजे.. 'आमची नियत'. पण वाईट याचं वाटायचं की, नंतर जी पुढे असायची.. ती आमचीच माणसं. आमच्याच कार्यात विघ्न आणायला उभी ठाकलेली.

दुसऱ्या दिवशी घरी परक्यांनी येऊन सांगावं.. साहेब, रसिक ग्रुपचा गुढी पाडवा सांस्कृतीक महोत्सव आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख झालाय, आम्ही का विरोध करू तुम्हाला.. उलट सहकार्य करायला हवं.।फक्त एकच विनंती करतो साहेब, मित्र ओळखायला शिका. एवढेच.

असतात अशी माणसे.. आपल्यातली परकी ज्यांना नाही सहन होत असं चांगलं काही, पण त्यांना याची कल्पना नसते. आपल्या खाली देखील किती अंधार आहे, अन् हे कोणी जगासमोर आणलं तर.. तर काय होईल.

पण असं काही करण्यासाठी तशी प्रवृत्ती लागते. सुदैवाने ती आमच्याकडे नाही. चलता है.. कधी कधी असंही वाटू लागतं की आपल्या आसपास अशा काही प्रवृत्ती हव्यात कश्याला. या वृत्तीपेक्षा सोन्यासारखी माणसे असतात ना.. आपला आधारवड बनून. तीच आपली खरी शक्ती असतात..

तुमच्या आमच्या जीवनात वेगवेगळ्या तऱ्हेचे असे अनुभव येतंच असतात. आपण पुढे चालायचं असतं.. बेधडक, बेभान.. चांगलं काही निर्माण करण्यासाठी...

- जयंत येलुलकर
(रसिक ग्रुप, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !