मुंबई - विधिमंडळ सभागृहात आज झालेल्या ठळक घडामोडी आणि कोणते मंत्री काय म्हणाले, ते आम्ही आपणास थोडक्यात सांगत आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट 'क' मधील लिपीकवर्गीय संवर्गातील भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असेल. त्यानुसारच अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध केली जाईल - मंत्री गुलाबराव पाटील.
मुंबई शहरातील ८,१७३ स्वच्छतागृहांपैकी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटिक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि इन्सिनेरेटर मशीन बसविण्यात येतील - मंत्री शंभूराज देसाई.
अनुसूचित जाती प्रवर्गातील २०० संशोधक विद्यार्थ्यांची बार्टीमार्फत फेलोशिपसाठी निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल - मंत्री संजय राठोड.
वेरूळ परिसरामधील तलाववाडी शिवारातील तलावाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होते. याबाबत एक महिन्यात सर्वेक्षण, मोजणी आणि आवश्यकता असल्यास अतिरिक्त भूसंपादन करून तीन महिन्यात शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल - मंत्री तानाजी सावंत.
राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा.