ऍड. उमेश अनपट (अहमदनगर) - एकाच कंपनीत कामाला असलेल्या व एकाच खोलीत राहत असलेल्या सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी एका कामगाराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हरिकेश हरिचंद्र यादव (वय २५, बिहार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी त्याला जन्मठेपेसह १० हजार रुपयांचा दंड भरण्याचेही आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन बी. पवार यांनी काम पाहिले. ही घटना सप्टेंबर २०१८ मध्ये घडली होती.
प्रभुनाथ यादव याचा खून झाला होता. तो आणि मारेकरी हरिकेश यादव नगरमध्ये एका फेब्रीकेशन कंपनीत काम करत होते. कंपनीत इतर १६ ते १७ कामगारही काम करत होते. त्यापैकी काही कामगार दुसरीकडे तर काही कंपनीने बनवलेल्या पत्र्याचे शेडमध्ये कंपनीतच राहत होते.
यापैकी अजय पटेल हा बिहार येथून आलेला होता. मयत प्रभुनाथ यादव मध्य प्रदेशचा होता. तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदीप यादव उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. सर्वजण इतर कामकारांसोबत कंपनीत काम करत होते.
प्रभुनाथ, आरोपी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदीप एकाच रूमध्ये राहत होते. सप्टेंबर २०१८ मध्ये ते बाजारातून भाजीपाला घेवून आले व संध्याकाळी जेवन तयार करताना आरोपी व मयत यांचेमध्ये चेष्टा मस्करीवरून भांडण व शिवीगाळ झाली. त्याचा हरिकेशला राग आला होता.
त्यांचे भांडण इतर दोघांनी मिटवले व जेवन करून सर्वजण झोपी गेले. साक्षीदार अजय यादव हा शेजारच्या रूममध्ये जावून झोपला. रात्री साडेतीन वाजता संदीप यादवला टण् टण् आवाज आला. त्यामुळे तो उठला व त्याने पाहिले की, आरोपीच्या हातामध्ये लोखंडी पाईप होता व तो पुन्हा पाईपाने वार करणार तेवढ्यात त्याने आरोपीस बाजुला ढकलले व ओरडला.
त्यामुळे कंपनीतील इतर कामगार तेथे जमा झाले. आरोपीने लोखंडी पाईपने डोक्यात मारल्यामुळे प्रभुनाथ जागेवरच गतप्राण झाला. इतर कामगारांनी मालकास फोन करून घटनेबाबत माहिती दिली.
कंपनीचे मालक अजय सोनवणी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आरोपी विरूध्द फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोरोना प्रार्दुभावामुळे वरील खटल्याचे चौकशीचे कामकाज बरेच दिवस सुरूळीत चालू शकले नव्हते.
नंतर न्यायालयाने खुप जलदगतीने खटल्याचे उर्वरित चौकशीचे कामकाज पूर्ण केले. त्यामुळे खटल्याचा निकाल लवकर लागला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
आरोपीनेही कोर्टामध्ये शपथेवर जबाब नोंदवला होता. सरकार पक्षातर्फे वकील पवार यांना पैरवी अधिकारी पोलिस हवालदार प्रबोध हंचे तसेच एमआयडीसी पोलिसांनी सहकार्य केले. आरोपी एका राज्यातील, मयत दुसऱ्या राज्यातील, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तिसऱ्या राज्यातील, अशा आव्हानात्मक खटल्यात न्याय मिळणे तशी जिकिरीची बाब होती, मात्र सरकार पक्षाने भक्कम बाजू मांडल्याने या खटल्यात न्याय मिळाला.