सोलापूर - एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने एका युवतीला आपल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार सोलापूर पोलिसांकडे दाखल झाली आहे. हा प्रकार वारंवार घडल्याचे पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी अहमदनगर येथील चित्रपट दिग्दर्शकावर पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय यु. पाटील (वय ५०, रा. बोलेगाव फाटा, नागापूर, नगर) असे दिग्दर्शकाचे नाव आहे.
संजय पाटील सध्या एक मराठी चित्रपट तयार करत आहे. त्यासाठी त्याने धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्ह्यातील येडशी येथे २० सप्टेंबर २०२२ रोजी अभिनय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील एक युवती गेली होती.
कार्यशाळा सुरू असताना चित्रपट कंपनीचा मुक्काम येडशीपासून जवळ असलेल्या उक्कडगाव (ता. बार्शी) येथील एका महाविद्यालयाच्या इमारतीत होता. तेथे दिग्दर्शक संजय पाटील याने पीडित तरूणीला आपल्या खोलीवर बोलावून तिच्याशी लगट केले.
चित्रपटात चांगली भूमिका देण्याचे आमीष दाखवून त्याने दबाव आणला. त्यामुळे युवती त्याच्या जाळ्यात फसली. तिने नाईलाजास्तव त्याची अपेक्षा पूर्ण केली. मात्र, दिग्दर्शकाकडून वारंवार या गोष्टी घडू लागल्या. पीडित तरूणीची तक्रार करण्याची इच्छा होती. परंतु कामाची गरज असल्याने तिचे धाडस झाले नाही.
मात्र अखेरीस अत्याचार सहन न झाल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन दिग्दर्शक पाटील याच्या विरोधात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाटील याच्या शोधासाठी तपास पथक रवाना केले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जायपत्रे हे करीत आहेत.