लातूर - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदी, वितरण आदिंवर होणाऱ्या शासनाच्या परिणामी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय कमी करण्यासाठी व उत्पादकांना व ग्राहकांना किफायतशीर किंमती मिळण्यासाठी राज्य अन्न आयोगाने गठीत केलेल्या समितीवर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने राज्य अन्न आयोगाने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन ' जिथे पिकेल, तिथेच विकेल ' या धर्तीवर स्थानिक पातळीवर शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामपंचायत किंवा शेतकरी यांच्याकडून अन्न धान्य पुरवठा संकलन करावे, या आशयाची मागणी किशोर श्रीधर देशपांडे यांनी अन्नसुरक्षा कायद्यान्वये राज्य अन्न आयोगाकडे केली होती.
त्या अनुषंगाने सुनावणी दरम्यान आयोगाने 'जिथे पिकेल तिथेच विकेल' या धर्तीवर अन्नधान्य संकलन करुन तेथेच वितरण केल्यास वाहतूक आदींवरी शासनाचा प्रचंड खर्च वाचेल व परिणामी करदात्यांच्या कराचा अपव्यय थांबेल, रोजगारांच्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांना देखील त्यांच्या मालास योग्य भाव मिळेल.
ग्राहकांना देखील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा योग्य दरात होईल.त्याच बरोबर शेतकरी, गट, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक कंपन्या हेही सक्षम होतील, असे म्हटले आहे. परंतु यासंदर्भात आयोगाकडे अनेक प्रकरणे आली असून त्यांचाही आशय हाच असल्याने व ही प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असल्याने यामध्ये तज्ञांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
सर्व अर्जदारांच्या वती ऍड. अजय तल्हार यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार आयोगाने सहा सदस्यीय समिती स्थापन करून या समितीला चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. याच राज्य अन्न आयोगाच्या तज्ञ समितीवर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची नियुक्ती राज्य अन्न आयोगाने केली.
याबद्दल अनिल घनवट यांचे लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, संपर्क प्रमुख मदन सोमवंशी, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, विवेक पाटील, दत्ता मुगळे, शिवाजी हजारे, वैजनाथ जाधव, दत्ता पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.