अहमदनगर - यावर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे खात्यासाठी आतापर्यंतच्या बजेट पेक्षा ९ पट जास्त रकमेचे बजेट सादर झाले. नव्या योजनेसाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यात नगरसाठी एका रेल्वे मार्गाचा समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केली आहे.
येलूलकर म्हणाले, आमचं शहर सुधारलं म्हणजे देश सुधारला ही आमची भावना झाली आहे. आयुष्य रडण्यात, खाच खळगे चुकवत घालायचं. धुळीच्या अंगान घरी यायचं. हे ज्याचं रोजचं जगणं, त्यानं कशाला साऱ्या जगाची चिंता करायची.
शहरातली ६५ टक्के मुलं काम धंद्यासाठी दुसऱ्या शहरात परागंदा झाली. वृध्द आई बाबा रोज मुलांबाळांची वाट बघत बसतात. येतील सुट्टीला, आम्हाला भेटायला याची आस आहे. अहमदनगर शहर पेन्शनरांच झाल आहे. हे गंभीर आहे. या शहराचं सुप्त दुखणं आहे, याचं कोणालाही भान नाही.
कोणालाही पुण्य घ्यायचं नाही. दुवा घ्यायच्या नाहीत. ना कोणाच्या ह्रुदयात आपल्या विषयी आदराचं स्थान निर्माण करायचं नाही. (राजकारण्यांना) यांना फक्त सत्ता हवी अन् त्यातून बक्कळ पैसा.
दलाली करायची, खोट्याच खर करायचं, ओढे बुजवायचे.. नाले बंद करायचे.. त्यातून करोडो कमवायचे.. हे तर यांचं सुख आहे. मग शहर जाईना का खड्ड्यात.. आपण रोज जगत आहोत.. मान खाली घालून.
सगळचं विस्कळीत झालंय. रेल्वे बजेट नव्या योजनेच्या तरतुदींमध्ये नगर पुणे लाईनचा समावेश करण्यासाठी प्रयत्न झाले तर भविष्यात आमचा मुलगा सकाळी डबा घेऊन पुण्यात कामाला जाईन अन् संध्याकाळी घरी तरी परत येईल, असे येलूलकर म्हणाले.
मिळूद्याना त्यांच्या आई बापाला सुख. मुला बाळात राहण्याचं. निदान हे काम तरी करा. या निमित्तानं हे शहर पुण्याचं उपनगर झालं तरी चालेल. पण थोडा विकास तरी होईल. मिळालेल्या खुर्चीचा आनंद आपण तिथे बसून दिलेल्या योगदानात अधिक असतो, असेही ते म्हणाले.