योगिता सुर्यवंशी (MBP Live24) - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार' या मराठी चित्रपटाने तब्बल ५ पुरस्कार मिळवत मोहोर उमटवली आहे. तसेच या वर्षीचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील 'तोरी अँड लोकिता' या चित्रपटाला देण्यात आला.
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप सोहळा गुरुवारी मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे दिमाखात पार पडला.
यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.
सुधीर मुनगुंटीवार म्हणाले, चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूर येथे नवीन चित्रनगरी उभारणार आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' च्या आधारावर राज्य सरकार फिल्म इक्वीटी स्टॉक एक्सचेंज सुरू करणार आहे. चित्रपटांमध्ये पर्यावरण हा विषय हाताळला जावा, जेणेकरून नागरिकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी चित्रपट निर्मात्यांना केले.
विद्या बालन म्हणाल्या, हल्ली अनेक जण मोबाईल, विविध सोशल मीडियावर सिनेमे पाहतात. फिल्म फेस्टिव्हलला येऊन प्रेक्षक सिनेमे पाहतील का, अशी शंका होती. पण पिफ महोत्सवाने याला अत्यंत समर्पक उत्तर दिले आहे. हा महोत्सव खरोखर कौतुकास्पद आहे.
असे आहेत आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -
- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - बेल्जियम आणि फ्रान्स येथील - तोरी अँड लोकिता
- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक - मरिना गोर्बाक - क्लोंडिके
- एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट - क्लोंडिके
- स्पेशल ज्युरी मेंशन - बॉय फ्रॉम हेवन
- स्पेशल ज्युरी मेंशन अभिनेत्री - लुबना अझबल- ब्ल्यू काफ्तान
हे आहेत मराठी चित्रपट पुरस्कार -
- महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट - मदार
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' - मंगेश बदर - मदार
- उत्कृष्ट अभिनेत्री - अमृता अगरवाल - मदार
- उत्कृष्ट अभिनेता - मिलिंद शिंदे - मदार
- उत्कृष्ट सिनेमाटोग्राफर - आकाश बनकर आणि अजय बालेराव - मदार
- उत्कृष्ट पटकथा पुरस्कार - राहुल आवटे - पंचक
- स्पेशल मेंशन ज्युरी अवार्ड - कुणाल वेदपाठक
- स्पेशल मेंशन ज्युरी - कविता दातिर - अमित सोनवणे