विवाहसोहळा म्हणजे 'आनंद क्षण'. पण त्यातील 'या' गोष्टी कधी बदलणार.?

काल एका सखीच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. डेकोरेशन, जेवण, सारच सुरेख. वधू आणि वरही मस्तच. पण जयमाला प्रदान करताना वराच्या मित्रांनी वराला उचलून घेतले. वधूने जयमाला वराकडे फेकली. ती काही गळ्यात पडली नाही. अलिकडे ही पध्दत फारच बोकाळली आहे.

साऱ्या गोष्टीत धमाल, मस्ती, सेलिब्रेशन हे पक्क बसलंय यांच्या डोक्यात. विवाहविधींचे अर्थ समजून घ्यावे असं कुणालाही वाटत नाही. चूक त्यांची नाहीच. आम्हीच आमचे संस्कार, विचारांचा गाभा नव्या पिढीकडे पोहचवू शकलो नाही, हेच आपलं अपयश आहे.

एका लग्नात तर काही टवाळ युवक मंगलाष्टक म्हणणाऱ्या पुरोहितांच्या तोंडावर अक्षता फेकत होते. ते बिच्चारे वैतागून गेले. मला राहवलं नाही. मी त्या मुलांना रागावले. विवाहविधींचे पुस्तक लिहत असताना मुलं म्हणाली मां, हल्ली एवढे विधी कोण करतं ? एवढा वेळ आहे का कुणाकडे.?

ज्यांना आवडेल ते करतील, बाकीच्यांनी चालू ठेवावं त्याचं जे चाललय.. अर्थ आणि कारण कित्ती सुरेख आहेत. खऱ्या अर्थाने पतीपत्नीनी एकमेकांचे सहचर कसे व्हावे, याचा वस्तुपाठ सांगणारे आमचे विवाहविधी आहेत. पण ते सोडून भपकेबाजपणा करणारे आम्ही.

सोयरे या शब्दाचा अर्थ कित्ती छान आहे. समोरच्याची सोय पाहतो तो सोयरा. इथे आम्ही समोरच्याला कसं अडचणीत आणता येईल हे पाहतो. मुलींच्या आईबापांनी आमच्या मुलाची हौस केली पाहिजे म्हणून मागण्यावर मागण्या केल्या जातात.

एक न आवडणारी प्रथा म्हणजे आईच्या वयाच्या स्त्रीने मुलीच्या आईने जावयाचे पाय धुणे. आईकडून पाय धुऊन घेण्यात कसलं आलय जावईपणं. सुशिक्षित मुलं या असल्या विधीला नकार देत नाहीत, हे आणि कष्टप्रद आहे. जणू मुलीला जन्म देऊन तिने गुन्हाचं केलाय.

पुर्वीची सामाजिक व्यवस्था वेगळी होती. पण आपण अजूनही त्याच मळलेल्या वाटेवरुन का चालायचं.? हे प्रश्न खरतरं नव्या पिढीला पडायला हवेत. मुली नकोत या विषयाची खोल वेदना 
अशा दृष्ट प्रथांमध्ये आहे.

बदल घडायला हवाच. बाईला वाटतं मी जे सहन केलं ते माझ्या पोटी येणाऱ्या मुलीला सहन करायला लागू नये. ही सुरक्षितता समाज कधी देणार ? आपण साऱ्यांनी यावर बोललं पाहिजे. लग्नात हल्ली फसवणूकही होताना दिसते.

एका मानसिक आरोग्य ठीक नसलेल्या मुलीला चांगल्या मुलाच्या गळ्यात बांधण्यात आलं. मुलाचं वय वाढत चाललेलं त्यामुळं मुलीच्या आईवडीलांनी गडबड केलेली मुलाकडच्या लोकांच्या लक्षात आली नाही. नंतर ते कुंटूब काहीच कारण नसताना ताणात सापडलं. वर घटस्फोट मिळावा म्हणून भरमसाठ पोटगी द्यावी लागली.

मुलाला व्यसनं असतं, काहीच करत नसतो तर लग्न झालं की सुधारेल अशा मानसिकतेचे आईबाप दुसऱ्यांच्या मुलीचा गळा कापतात. ती पोरं आयुष्यभर सहन करत रहाते. तुमच्या तीस वर्षाच्या मुलाला तुम्ही सुधारु शकला नाहीत तर ती पंचविशीतील मुलगी कशी सुधारेल.? 

खरतर सगेसोयरे एकत्र येऊन एक कुटुंब बनायला हवे, ते होतचं नाही. लग्नातील भपका महत्वाचा का वाटतो ? ही भपकेबाजपणा करायची मानसिकता वाढत चालली आहे. थीम विवाह, प्री वेडींग शूट.. हे सारं खरतरं अत्यंत खाजगीपण जपणारं, पण त्यातही बाजारुपणाचा कळस झालाय...

त्यात सोशल मिडीयावर खाजगी क्षणांचे फोटो पाठवायची चढाओढ. कुठं चाललंय हे सारं.. मुलांमुलींनी हे लक्षात घ्यायला हवं की आपण आईवडिलांना ही उधळपट्टी करण्यापासून थांबवायला हवं. तीच रक्कम भविष्यकाळात वापरता यावी म्हणून ठेवण्याची गरज आहे. लेक जाताना होणारी घालमेल आता कुणाच्या ध्यानात तरी येते का ? 

मुलांमुलींना आपण सारे ब्रँडेड घ्यायला शिकवतो. पण आपण दुसऱ्यांच्या घरी जाणार आहोत, तिथली जीवनपद्धती आपल्याला स्विकारावी लागणार आहे, किंवा घरात एक उच्चशिक्षित मुलगी येणार आहे, तर आपल्या समोरच्याला न आवडणाऱ्या सवयी बदलायला हव्यात..

सहचर म्हणून एकमेकाना स्विकारायला हवं, आर्थिक व्यवहार हे घरातील स्त्रियांनाही माहित व्हायला हवेत. ह्या गोष्टी दोन्हीही बाजूंनी लक्षात घ्यायला हव्यात. लग्नं दोन कुटुंबियांना आनंदक्षण वाटावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

घटस्फोट होऊ नयेत, यासाठी लग्नाआधी परस्परांनी घरातल्या अडचणी, खर्च, नातेसबंध यावर एकमेकाच्यात, आईवडिलांच्या बरोबर चर्चा व्हायला हव्यात. कारण आयुष्य हे 'टिश्यु पेपर'सारखं नाही. युज अन थ्रो करायला.

'लिव्ह इन'च्या जगाचं आकर्षण का वाटतं मुलामुलींना, ह्याचा शोध घ्यायला हवा. स्वातंत्र्य हवंय सगळ्यांना. हे तर तुम्ही लग्नानंतरच्या आयुष्यातही देऊ शकता. यासाठीच समोरच्याला माणूस समजायची आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृतीचा फुकाचा अभिमान दाखवण्यापेक्षा, ती टिकवायची असेल तर कृतीशील असणं गरजेचं आहे.! 

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !