भव्य मिरवणुकीद्वारे गणेश देशमुख यांचा नागरी सन्मान
अँड. उमेश अनपट (MBP Live24) | शेवगाव : प्रजासत्ताक दिनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकावर नाव कोरून अवघ्या महाराष्ट्र पोलिस दलासह भावी तरुण पिढीसमोर 'हिरो' ठरलेल्या पोलिस लिपिक गणेश देशमुख यांनी कुठलाही बडेजावपणा न करता नागरी सत्कार मिरवणुकीद्वारे देखील समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवण्याचे कर्तृत्व पार पाडले.ढोरजळगावचे सुपुत्र, शेवगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्हा व राज्याचे भूषण माजी एनसीसी अंडर ऑफिसर गणेश देशमुख हे सध्या मुंबई येथील मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्रात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. पोलिस सेवेतील आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने गौरविण्यात आले.
या कामाची दखल घेऊन ढोरजळगावचे ग्रामस्थ, कुटूंबीय, मित्र परिवार आणि एनसीसी सोल्जर फ्रंट यांच्या वतीने देशमुख यांची गावातून आगळीवेगळी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार या मिरवणुकीत कुठलाही बडेजावपणा करण्यात आला नाही, हे विशेष.
समतेची जपवणूक - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ढोरजळगावातील भवानी मातेच्या मंदिरापासून वाजतगाजत निघालेल्या या अनोख्या मिरवणूकीने सर्वांचेच लक्ष वेधले. कारण, एरवी अशाप्रकारची मिरवणूक म्हटले, की सत्कारमूर्ती व्यक्तीला उंची वाहनात बसवून बाकी लोक पायी चालतात. अशी दुजाभावरुपी विचित्र पद्धतीने मिरवणूक काढण्याची प्रथा सध्या प्रचलित होत आहे.
मात्र सत्कार मूर्ती गणेश देशमुख आणि त्यांचे बंधू निवृत्त लष्करी जवान दिगंबर देशमुख यांनी अत्यंत साध्या पद्धतीने ही मिरवणूक काढण्याचे नियोजन ग्रामस्थांच्या मदतीने करत एक आगळा वेगळा पायंडा पाडला. केंद्रीय स्तरावरील सर्वोच्च बहुमान मिळालेला असताना देखील मित्र, गावकरी यासर्वांसह अगदी पायी चालत देशमुख यांनी मी आजही तुमच्यातीलच पूर्वी गावात मजुरी करणारा गणेशच आहे, ही आपलेपनाची भावना अधोरेखित केली.
देवी-देवतांच्या साक्षीने कौतुक मिरवणूक - ढोरजळगावातील तुळजा भवानीदेवी मंदिरातून देशमुख यांच्या कौतुक मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी पत्नी स्वाती गणेश देशमुख, वहिनी स्वाती दिगंबर देशमुख, गौरी देविदास देशमुख, उमाबाई विजय लांडे यांनी औक्षण केले. यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेऊन पुढे हनुमान मंदिरात सत्काराच्या कार्यक्रमाने सांगता झाली.
माझ्या शैक्षणिक प्रवासाची तृप्ती : ऑनररी मेजर चोथे
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑनररी मेजर जी. एम. चोथे सर म्हणाले, इतिहासाचा गुणी विद्यार्थी, एनसीसी चा शिस्तप्रिय व कर्तबगार अंडरऑफिसर अशा दुहेरी भूमिकेत गणेश देशमुख ला मी शिक्षक म्हणून अनुभवलेय. याकाळात माझ्या शैक्षणिक जीवनातील एक आदर्शवत विद्यार्थी अशीच अनुभूती गणेशने मला दिली. पुढेही पोलिस विभागात कर्तव्य बजावताना देखील त्याने आपल्यातील शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर सर्वोच्च अशा केंद्रीय गृहमंत्री पदकापर्यंत मजल मारली. एखाद्या शिक्षकाच्या अवघ्या जीवन प्रवासालाच तृप्ती लाभावी, असा हा माझ्या आयुष्यातील परमोच्च क्षण आहे.
एनसीसी सॉल्जर फ्रंटच्या वतीने प्रवीण उकिर्डे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणेश सोबतची मैत्री ते एनसीसी जीवनातील सहवास त्यांनी व्यक्त केला.
भविष्याची वाट लोकोपयोगी उपक्रमातून : गणेश देशमुख - गावाने काढलेली मिरवणूक ते सत्कार हा संपूर्ण प्रसंग भारावून टाकणारा असून माझ्या डोळ्याच्या कडा अक्षरशः पानावल्या आहेत. माझ्या गावाने दिलेला हा सन्मान अभेदयपणे आजीवन स्मरणात राहील. लहानपनापासून ते पोलिस दलात नोकरीस लागेपर्यंत आणि पुढे केंद्रीय गृहमंत्री पदकापर्यंतची वाटचाल निश्चित साधी, सरळ व सोपी नव्हती. त्यासाठी मोठी संघर्षमयी वाट चालावी लागली. लहानपणी मजुरी करणे, एनसीसी मधील परिश्रम नोकरीतील कामातील सचोटी आदी मधून तावून सुलाखून निघाल्यावर हे यश संपादित करता आले. या वाटेत पदोपदी मार्गदर्शक म्हणून साथ लाभली ती माझे गुरुवर्य चोथे सर यांची. हा परिसस्पर्श झाला आणि माझे जीवन झळालत गेले. मी गावाचे व या देशाचे देणे लागतो. म्हणूनच भविष्यातही देश हितकारक असा एक लोकोपयोगी उपक्रम हाती घेऊन पुढील स्तरावर जाण्याची ही उत्कर्षवर्धक वाट चालतच राहील, याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना गणेश देशमुख यांनी दिली.
मनोगत व्यक्त करताना किसान आघाडी जिल्हाध्यक्ष कचरुभाऊ चोथे
एनसीसी सोल्जर फ्रंटचे सदस्य प्रवीण पंडित, ऍड. उमेश अनपट, प्रा. प्रवीण उकिर्डे, वसंत देशमुख सर, मारुती फरताळे, रमेश जाधव, पाटेकर आदीनी सत्कार केला.
ऑनररी मेजर जी. एम. चोथे सर यांच्या अध्यक्षस्थानी हा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी भाजपा किसान आघाडीचे राज्यकार्यकारणी सदस्य बापुसाहेब (नाना) पाटेकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष कचरुभाऊ चोथे,राजेंद्र देशमुख, सरपंच अनंता उकिर्डे, गणेशजी कराड, उपसरपंच गणेशजी पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य रोहन साबळे, जयकुमार देशमुख, डॉ. देविदास देशमुख, कैलास पाटेकर, संतोष आकोलकर यासह ग्रामस्थ, मित्र परिवार, कुटूंबीय, नातेवाईक, एनसीसी सोल्जर फ्रंटचे सदस्य प्रवीण पंडित, ऍड. उमेश अनपट, वसंत देशमुख सर, मारुती फरताळे, रमेश जाधव, पाटेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेवजी पाटेकर यांनी केले.
'सर्वोत्कृष्ठ' पोलिस बहीणीचाही गुणगौरव
गणेश देशमुख यांच्या मोठ्या बहीण तनुजा देशमुख या देखील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. आपल्या कर्तव्यात प्रामाणिक व कर्तृत्ववान महिला पोलिस म्हणून जनसामान्यात सर्वोत्कृष्ठ प्रतिमा निर्माण करणाऱ्या आठ महिला पोलिसांचा तेथील पोलिस आयुक्ताकडून नुकताच दीड लाख रुपयांच्या इलेक्ट्रिक बाईक देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचाही यथोचित गुणगौरव यावेळी करण्यात आला.
गणेश देशमुख यांच्या मोठ्या बहीण तनुजा देशमुख या देखील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. आपल्या कर्तव्यात प्रामाणिक व कर्तृत्ववान महिला पोलिस म्हणून जनसामान्यात सर्वोत्कृष्ठ प्रतिमा निर्माण करणाऱ्या आठ महिला पोलिसांचा तेथील पोलिस आयुक्ताकडून नुकताच दीड लाख रुपयांच्या इलेक्ट्रिक बाईक देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचाही यथोचित गुणगौरव यावेळी करण्यात आला.
देश सेवेचे व्रत जोपासणारे देशमुख बंधू -भगिनी...
गणेश देशमुख व बहीण तनुजा या दोघांबरोबरच त्यांचे लहाण बंधू दिगंबर देशमुख हे देखील भारतीय लष्करात कर्तव्यात होते. या सेवेनंतर आता ते गावातील सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. तिघेही बहीण-भाऊ मिळून आपल्या कर्तव्यातून हा समाजसेवेचा वसा निरंतर चालवत आहेत. हे कुटुंब गावासाठी एक आदर्श बनले आहे.