जिवलगांचे अचानक दूर जाणं..
त्यानंतर हे जग बदलेल याची असणारी खात्री..
सर्व अडून राहील यावरही असलेला ठाम विश्वास
पण..
काय बदललंय ?
सुर्य रोज नव्याने क्षितीजावर उगवतोच आहे..
किरणांची वाढीव उबदार माया फेकत माथ्यावर येतोच आहे..
केशरी साय गोळा करत मावळतोय देखील..
नवथर पदलालित्याचा झंकार उमटवत रात्र होतेच आहे..आभाळभर खेळ मांडणारा चंद्रही प्रकाशतोय..आशा आकांक्षांच्या सूपभर चांदण्या लुकलुकतायत..हो. काहीच बदललेलं नाहीय..
श्वासांची लय तीही तशीच वाहतेय..
एकसंध गतीनं हृदयाचं कंपन चालूच आहे .
अविश्रांत उघडझाप करत पापण्यांची फडफड होतेच आहे..
डोळ्यांतील पाणवठे काठाकाठांनं उतू जाताहेत..
हो, काहीच बदललं नाहीय..
ओठांचं शुष्क पानगळीसारखं कोरडेपण राखाडी रंगाची मिजास बाळगतंय..जिभेचं अनिवार्य अडखळणं, तेही तसंच..चार शब्दांसाठीची केविलवाणी धडपड चालूच आहे.
काही धीट शब्द..
कधी मनापासून उच्चारलेले,
तर कधी मनाविरुद्ध बाहेर पडलेले..
त्यांचे क्षीण, मंद स्वरातील उच्चार,
तेही तसेच आहेत.
हो काहीच बदललेलं नाही.
पाखरांची रात्रीच्या गुजगोष्टीसकाळी एकमेकांच्या कानावर घालणारी मंजुळ किलबिल ऐकू येतेच आहे..पानांची जीवघेणी, गुढ सळसळकाही गुपित सांगू पाहतेय..
झाडांचं आपल्याच तंद्रीत डोलणं सुरुच आहे
फुलांचा आणि फुलपाखरांचा वाऱ्याशी चालणारा लपंडाव रंगात येतोय..
हो काहीच बदललं नाहीय.
फक्त...रात्रभर डोळ्यांनी झोपेशी घेतलेली फारकत बेचैन करतेय..उघड्या डोळ्यांसमोर होणारा स्वप्नांचा विध्वंस पाहतांना होणारी ससेहोलपट सोसवत नाहीय..
अंधारात मार्ग शोधण्याचा व्यर्थ प्रयास करणारे डोळे थकून जाताहेत..
स्वप्नांच्या राशी तुडवणारे अनवाणी पाय रक्तबंबाळ होताहेत...
बस्स...!
एवढाच बदल झालाय..
फक्त..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)