खरं सांगू...!
सारखं वाटतं,
खूप काही करायचं राहिलं आयुष्यात..
काही चांगलं घडावं..
आनंद हवा..
आपली काही स्वप्न असतात..
काहीशी सफल..
तर काही स्वप्नच..
मनातल्या मनात तशीच...
आपण काहीच करु शकलो नाही या जीवनात..
असंही वाटुन जातं कधी..
एकदाच आहे..हे जे काही मिळालंय ते..परत मिळेल का...?गेलेला क्षण तरी परत येईल का...?
गाडी सुसाट धावत आहे..
परत कधी वळणारही नाही,
जेथून आलीय तिथे..
वेळ थोडा आहे...
अजून खूप सारं राहुन गेलंय....
मावळत्या सूर्याच्या साक्षीने,समुद्र पहायचा..लाटांची गाज ऐकत रमून जायचं..त्याच्याशी बोलायचं..पहाटे महालामागून येणाऱ्या सूर्याकडे प्रार्थना करायची...
दिवसभर शेतात राबणाऱ्या बैलाच्या पाठीवर हात फिरवत
त्याच्या डोळ्यांतील करुणा पहायची...
गोठ्याकडे निघालेल्या गाईच्या गळ्यातील घंटीचा नाद ऐकायचा राहिलाय अजून..
सकाळी सकाळी पानावर पडलेल्या दवबिंदूचं सौंदर्य जाणून घ्यायचं राहूनच गेलंय..अत्तर, स्प्रे सोडून पावसाच्या थेंबाने सुगंधी झालेल्या मातीनेओंजळ भरून घ्यायची आहे...
रस्त्याच्या सिग्नलवर उभ्या चिमुकल्यांच्या स्वप्नांना गोंजारावस वाटतं...
आजी आजोबांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यांना आनंद द्यावा वाटतो...
रोजच्या धावपळीत मुलांना मिठीत घ्यायचंही राहिलं..
संध्याकाळी डोंगर माथ्यावर उभं राहून लांबवरचे चमकते दिवे पाहायचं सूख अनुभवायचं आहे...बाबांशी गप्पा मारायच्या..त्यांची सेवा राहून गेलीस्वतःशी बोलायचं...एकांतात रडायचं ...
सगळे संदर्भ जाणायचे..
विसरून गेलं...
अन्
या जगण्यालाच एक दिवस कडकडुन मिठीत घ्यायचं...
तेही राहून गेलं...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)