पोलिस कर्मचारी गणेश देशमुख यांनी नोंदवला अनोखा विक्रम
ऍड. उमेश अनपट (नाशिक) - वडिलांचे छत्र हरपल्याने अचानक आर्थिक गर्तेत सापडलेल्या कुटूंबाला सावरण्यासाठी आणि बेतलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी बालवयातच मजुरी करावी लागली. अशा इयत्ता ७ वी मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी मजुरीचे चटके सोसण्याची वेळ आलेल्या मुलाने केवळ आपली जिद्द आणि अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे पोलिस दलात सेवा बजावताना थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पदकाला गवसनी घातली आहे.
गणेश देशमुख यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या या अद्वितीय, उतुंग कामगिरीने महाराष्ट्राची मान देशस्तरावर दिमाखात उंचावली आहे. अशी कामगिरी करणारे पोलिस लिपिक वर्गतील ते एकमेव कर्मचारी ठरले आहेत, हे विशेष.
पोलिस प्रशिक्षणात सेवा बजावताना केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल छातीवर केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक विराजमान होण्याचा बहुमान पटकवणाऱ्या गणेश देशमुख यांचा जन्म सुभाष देशमुख या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात १९७९ साली झाला. बालक्रीडाचा आनंद घेत असतानाच वयाच्या सहाव्या वर्षीच १९८५ साली वडिलांचे छत्र हरपले.
देशमुख कुटूंबावर अक्षरशः डोंगर कोसळला. त्यावेळी परिवारात एक मोठी बहीण, एक छोटा भाऊ, आई, आजी, आजोबा असा मोठा परिवार होता. त्यात आजोबा काही काम करत नव्हते. केवळ मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घर चालत नसल्याने आई आणि आजी स्वतःच्या शेतात काम करत होत्या.
नंतर विहिरीचे पाणी आटल्यानंतर त्या दोघीही दुसर्याच्या शेतात रोजाने कामाला जायला लागल्या. आधीच कुटुंबातले सदस्य जास्त असल्यामुळे आणि तीन मुलांचे शिक्षण चालू असल्याने खर्च भागविताना या कुटुंबाची तारेवरची कसरत सुरु झाली.
आई आणि आजीच्या मेहनतीने कसेबसे घर चालत असताना इयत्ता ७ वी मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी अगदी कोवळ्या वयात मजुरी करायला सुरुवात झाल्याने गणेश देशमुख यांचे बालपण कोमेजून गेले. याच मजुरीच्या खडतर वाटेवरती प्रवास सुरु झाला.
तिसऱ्या दिवशी गरिबी आणि पैशावाले नातेवाईक यातील फरक जाणवणारा धक्का बसवणारा प्रसंग या कोवळ्या मनावर बितला. जो या कोऱ्या मनाच्या पाटीवर खोलवर कोरला गेला आणि जो आजपर्यंत विसरला गेला नाही.
शाळेला दांडी न मारता सुट्ट्यांच्या दिवशी मजुरी करणे, हे पुढे वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत म्हणजे नोकरी मिळेपर्यंत चालू राहिले. वाळू, विटा भरणे, पाईपलाईन खोदणे, विहीर खोदणे, दुसऱ्याच्या शेतात शेतीची कामे करणे, उसाची लागवड करणे, मंडप बांधायला जाणे अशी कामे कधी एकट्याने तर कधी कामगारांच्या टोळीत काम केले.
घर चालवायला, कपडे आणि शिक्षणाला मदत म्हणून ही खडतर, काटा कुपाट्याची वाट हतबलतेमुळे अनवानी चालावी लागली. महाविद्यालयीन प्रवासातही परिस्थितीच्या झळा सोसत मोठ्या जिद्दीने शिक्षणाची वाटचाल सुरु ठेवली. केवळ कुटुंबाच्या आणि स्वतःच्या उज्वल भविष्याच्या आशेने.
एफवायबीएला प्रवेश घेतल्यानंतर "एनसीसी" मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी महाविद्यालयात कमवा आणि शिका योजनेत काम चालूच होते.
'दिल्ली परेड'ला गवसनी - राष्ट्रीय छात्र सेनेत कॅडेट म्हणून घडताना तिसऱ्या प्रयत्नात २६ जानेवारी १९९९ ला दिल्ली येथे झालेल्या राजपथावरील संचलनात एनसीसीच्या माध्यमातून सहभाग नोंदवत कुटुंबाचे, गावाचे, महाविद्यालयाचे, जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव त्यांनी देशस्तरावर उंचावले.
एनसीसीच्या प्रवासाला आणि जीवनाला दिशा देणारे इतिहासाचे प्रोफेसर आणि ऑनररी मेजर श्री गिनेनदेव चोथे सर यांच्या रूपाने आयुष्यभरासाठीचे गुरू लाभले.
एमए फर्स्ट पार्टला शिकत असताना अनुकंपा तत्वावर २५.१०.१९९९ ला पोलीस खात्यात कनिष्ठ श्रेणी लिपिक या पदावर नोकरी मिळाली.
उंचीवर जाणारा शैक्षणिक आलेख असल्यामुळे गणेश देशमुख यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेऊन असणारे त्यांना घडवणारे सर्व गुरुवर्य मात्र यामुळे नाराज होते. यासाठी तुला घडवले नाही तुला अधिकारी व्हायचे आहे, तू ही नोकरी स्वीकारू नकोस असे सर्वांनी सांगितले.
पण परिस्थितीच्या फटक्याना तोंड देण्यासाठी पुढे नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता. पुढे नोकरी करताना एमए चे शिक्षण पूर्ण केले. आर्मी ऑफिसर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसएसबीच्या ३ इंटरव्ह्यू दिल्या. मात्र अपेक्षित यशापर्यंत पोहोचता आले नाही. हिरमोड जरूर झाला. मात्र, जिद्दीने पोलिस सेवेचा मार्ग पुढे यशस्वीपने चालत राहिले.
पोलिस सेवेतील उतुंग प्रवास - पहिले ३ वर्ष पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयात, नंतरचे साडेतीन वर्ष उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू कार्यालयात, पुन्हा साडेपाच वर्ष पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयात नोकरी केली.
याच ठाणे ग्रामीण कार्यालयात प्रशासकीय कामाचे धडे अनेक वरिष्ठांकडून शिकले. त्यात अत्यंत प्रभावी मार्गदर्शन लाभले ते कार्यालय अधीक्षक श्री मोहन गवस यांचे. प्रशासकीय गुरू म्हणून त्यांचे आयुष्यातील स्थान कायम झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभिलेख अत्युत्कृष्ट बनत गेला.
पोलीस विभागातील लिपिकांच्या सेवाप्रवेशोत्तर परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित 'मार्गदर्शिका' नावाचे पुस्तक तयार करण्यात महत्वाचा सहभाग असल्याने श्री गवस साहेबांसोबतच तत्कालीन गृहमंत्री कै. आर.आर. पाटील साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
नंतरची साडेचार वर्षे पोलीस आयुक्त, ठाणे शहर कार्यालयात नोकरी झाली. आणि वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नतीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे नेमणूक ६ फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्रात आता जवळपास ७ वर्ष सेवा पूर्ण होत आली आहे.
या कालावधीत आस्थापना लिपिक म्हणून सहा महिने आणि नंतर प्रशिक्षणार्थी यांचेशी संबंधित अशासकीय निधीचा रोखपाल म्हणून कर्तव्य पार पाडले. हे काम करताना कार्यालयाच्या गरजेनुसार कोणत्याही कार्यासनाचे काम उत्साहात केले. त्याबाबतच्या पोहच पावत्या बक्षीस रुपाने सेवापुस्तकात नोंद होत गेल्या.
सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून स्वतःच्या कार्यासनाचा कार्यभार सांभाळून प्रमुख लिपिक पदाचा कार्यभार नियमितपणे सांभाळला आहे व अजूनही सांभाळत आहेत. प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मेस कपातीची रक्कम कमी होण्यासारखे अनेक कामे करता आली. ज्याचा लाभ वर्षानुवर्षे प्रशिक्षणार्थी यांना होणार आहे.
प्रशिक्षण केंद्रात येण्यापूर्वी व आल्यानंतर कामगिरीला अनुसरून मिळालेले अत्युत्कृष्ट गोपनीय शेरे, बक्षिसांची १४० प्लस संख्या, पूर्व सेवेत केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वात महत्वाचे प्रशिक्षण केंद्रात केलेले उल्लेखनीय काम या सर्व धिरोदात्त, उतुंग कामगिरीचा सारासार विचार करूनच गणेश देशमुख यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक घोषित करण्यात आले आहे.
पोलिस प्रशिक्षणात सेवा बजावताना केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी त्यांना हे मानाचे पदक बहाल केले जाईल.