जाणिव म्हणजे काय ? समाज, जागृतावस्था किंवा स्वतःसह सभोवतालला जाणून घेण्याची क्षमता. स्त्री ही पुरुषाप्रमाणे माणूस असून तिचे नैसर्गिक अधिकार पुरुषसत्ताक व्यवस्था नाकारते, हे समजणं म्हणजे स्त्रीवादी जाणिव होणे.
स्त्री-पुरुष समता, स्त्रीचा माणूस म्हणून विचार,मानवी हक्काची प्राप्ती, पुरुषसत्ताक कुंटूबव्यवस्थेला नकार आणि स्त्रीचा मानसिक विकास व स्वत्व संपादन या तत्वांच्या आधारे स्त्रीवादी जाणिवेचा विकास होऊ शकतो.
सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीवादी जाणिव झाली असेल तर त्या होत्या संत जनाबाई. नामदेवांच्या घरात काम करणाऱ्या अनाथ असलेल्या नामदेवांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या जनाबाई. त्या काळातील संतांकडूनही उपेक्षित राहिल्या.
नामदेवांनी संताची चरित्रे लिहिली, पण स्वतःच्याच घरात राहणाऱ्या जनाबाईंविषयी काहीही लिहिले नाही. जनाबाईंच्या जाणिवा मात्र प्रखर होत्या. स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा रोवणाऱ्या होत्या. कारण परंपरेचे कोणतेही बंधन न पाळता ती व्यक्त होते.
स्त्रीच्या डोईवरील पदर म्हणजे समाजव्यवस्थेने लादलेल्या रुढींचे, बंधनांचे आणि भासमय घरंदाजपणाचे प्रतिक आहे. तो पदर खांद्यावर घेऊन जनाबाई सामाजिक संकेतांना धक्के देते.. ती म्हणते,
डोईचा पदर आला खांद्यावरी !भरल्या बाजारी जाईन मी..हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणाआता मज मना कोण करी..!
घरात न बसता ती भरल्या बाजारी जाते. हातात टाळ आणि खांद्यावर वीणा घेऊन बाजारात जाण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, असा निर्धार व्यक्त करते. हा निर्धार भक्तीसाठी आहे. हे असं असलं तरी जनाबाईं पुरुषसत्ताक व्यवस्थेने लादलेल्या बंधनातून ती मुक्त होऊ पहाते.
स्त्रीला नेहमी दुय्यम समजणाऱ्या पुरुषाला सावित्रीबाई म्हणतात, 'बाईल काम करत राही.. ऐतोबा हा खात राही, पशुपक्ष्यात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का.?
ताराबाई शिंदे यांनीही आपल्या धर्मग्रंथातील स्त्री-पुरुष विषमतेचा कडाडून समाचार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल घटना समितीमध्ये 'हिंदू संहिता विधेयक' सादर केले. मालमत्तेत मुलींना समान हक्क हा विचार मांडला. स्त्रीला मिळालेला हा हक्क तिच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरला आहे.
राजर्षी शाहू महाराज आणि धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीच्या स्वाभिमानासाठी मांडलेले विचार व केलेले कार्य इतिहासात नोंदले गेले आहे. या महान लोकांमुळ स्त्रीला शिक्षणाची दारे उघडली. स्त्रिया शिकल्या. सर्वच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय भरारी घेतली. पण आजही त्यांच्या मानसिक आणि शारारिक सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे.
आठ मार्च हा जागतिक महिला दिन किंवा स्त्री मुक्ती दिन साजरा केला जातो. हा दिवस जितका महत्त्वाचा आहे. तितकंच स्त्रीवादी जाणिवेचा प्रसार आणि विकास होणं अतिशय महत्त्वाचे आहे. स्त्रीयांमध्येच आधी स्त्रीवादी जाणिवा प्रखर होणे आवश्यक आहे.
मराठी साहित्यातील लेखिका आता स्त्रीवादी जाणिवेने लेखन करत आहेत. केवळ शिक्षित होऊन जाणिवा विकसित करता येत नाहीत. त्यासाठी स्वतःसह व्यवस्थेची चिरफाड करावी लागते. अर्थात व्यवस्थेच्या चौकटीने दिलेले बंदिस्तपण अलंकारच समजून घेतले तर प्रश्न निर्माण होत नाहीत.
टोचणारी बाब टोचू दिली तर प्रश्न निर्माण होत नाही. पण त्याविरुध्द विचार, कृती करायची असेल तर ती चौकट तिने समजून घेतली पाहिजे. चौकट कितीही सजवली तरी ती नवीन असू शकत नाही, तसेच स्त्री जीवनाचे आहे. चौकट ही चौकटच असते. म्हणजे बंदिस्तपणा आलाच ना..
लेखिका असो किंवा लेखक, वास्तववादी लिखाण म्हणजे जसे आहे तसे मांडणे आणि ते जाणिवेच्या अंगाने मांडणे यात खूपच फरक आहे. जाणिवेने केलेले लेखन समाजपरिवर्तनाची दिशा दाखवते. तेव्हा गुळगुळीत.. गोडमिट्ट स्वप्नं समाजाला दाखविण्यापेक्षा खरं ते लिहून समतेच्या दिशेने पाऊल टाकूया.!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)