अहमदनगर - महेश अंबादास डाळींबकर रा. माऊलीनगर, मिरी रोड, शेवगाव, जि. अहमदनगर या आरोपीला शेवगाव न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांनी सुनावलेली सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी अपिलात देखील कायम ठेवली आहे.
महेश डाळिंबकर याला विनयभंग केल्याप्रकरणी १ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रूपये दंड, व दंड न भरल्यास ७ दिवसाची साधी कैद तसेच धमकी दिल्याप्रकरणी ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहिले.
पिडीता ही आरोपीकडे २०१० ते २०१२ दरम्यान क्लास घेण्याचे काम करीत होती. त्यामुळे आरोपी व पिडीतेची चांगली ओळख होती. दरम्यानचे कालावधीत आरोपी हा पिडीतेस म्हणत असे की, माझे तुझेवर प्रेम आहे. दिनांक २० एप्रिल २०१४ रोजी आरोपीने पिडीतेस घरी बोलावून तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक अत्याचार केले.
म्हणून पिडीतेने आरोपीविरुध्द फिर्याद दिली होती. या केसमध्ये आरोपीस शिक्षा झालेली आहे. दि. १ मे २०१५ रोजी आरोपीने दुपारी ३.१५ चे दरम्यान मोटार सायकलवरून ढोरजळगाव शिवारात येवून पिडीतेच्या घरासमोर गाडी लावून, पिडीतेचा हात धरून तिच्या नवऱ्याला संपवून टाकेल, अशी धमकी दिली.
या घटनेमुळे पीडितेने आरोपीविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे विनयभंग आणि धमकी दिल्याची फिर्याद दिली. त्याप्रमाणे कनिष्ठ न्यायालयात या केसची चौकशी होवून कनिष्ठ न्यायालयाने वर नमूद केल्याप्रमाणे शिक्षा दिलेली होती. या शिक्षाविरुध्द आरोपीने अहमदनगर येथील सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते.
या फौजदारी अपीलामध्ये आरोपी व सरकार पक्षाचा युक्तीवाद होवुन कनिष्ठ न्यायालयाने दिलेली वरिलप्रमाणे शिक्षा कायम ठेवली. या अपिलाचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने ऍड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहिले.