आज एका मैत्रिणीने विचारलं,
'राही'चा अर्थ काय ?
मग हे सुचलं..!
मातापित्यांचे भक्त असलेले पुंडलिक यांना भेटायला पांडुरंग पंढरपुरी निघाले. लक्ष्मीबाईला चल म्हणाले, त्यांनी नकारच दिला. पांडुरंगला पुंडलिकाच्या भेटीची ओढ लागलेली... 'जणू पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गां, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा' होय ना...
पुंडलिक मातापित्यांचे पाय चेपत होते. पांडुरंगांनी हाक मारली, 'पुंडलिका मी बाहेर आलोय, ये..!' पुंडलिकाने दरवाजातून बाहेर पाहिले, पण न उठताच जवळची एक कच्ची वीट पांडुरंगाकडे भिरकावली, अन म्हणाला, "देवा,जरा दम धरा, आईबाबांचे पाय चेपतोय, तोवर ह्या वीटेवर उभे रहा माऊली...!
बराच वेळ कंटाळून पांडुरंग उभे राहून कंटाळले. मग कंबरेवर हात ठेवून उभे राहिले. मातापित्यांना झोप लागल्यावर पुंडलिक आले. कंबरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या पांडुरंगांचे चरणी डोकं ठेवलं. पांडुरंग म्हणाले, "पुंडलिका, तुझी मातृपितृ भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय, माग तुझी काय इच्छा आहे."
पुंडलिक वदला, "भगवंत, माझ्यासाठी इथ आलायस ना, तर असाच उभा रहा याचं रुपात. दर्शन देऊन साऱ्यांचे मनोरथ सफल केलेस तसेच सगळ्यांचे कर.. तु माझ्यासाठी इथं आलायस, हे अवघ्या जगाला कळू दे.."
पांडुरंग तथास्तु म्हणाले, इकडे लक्ष्मीबाई वाट पाहून थकल्या आणि स्वतः पंढरपुरी दाखल झाल्या. 'यावे लखुबाई' (लक्ष्मीबाई) असं म्हणून लक्ष्मीचे आगतस्वागत केले. लखुबाईचा अपभ्रंश होत होत रुखमाबाई झाला. अन तिचे माहेरच नाव रुक्मिणी आहेच की..!
पांडुरंगांला त्यांनी विनवले, आता चला घरी पण पांडुरंगांनी सांगितलं, मी पुंडलिकाला वचन दिलंय, जगाच्या कल्याणासाठी मी इथेच थांबणार.. आता माता रुक्मिणी घाबरल्या. परत द्वारकेलाला गेल्या. सौंदर्यवती सत्यवतीला घेऊन पांडुरंगांला न्यायला आल्या. पण मंडळी पांडुरंगच ते.. बधले नाहीत.
मग लक्ष्मीने राधेला आणले, पण राधा साऱ्या मनोकामनावर विजय मिळवलेली. ती आली पण तिने रुखमाबाईची आणि सत्यभामेची समजूत घातली, "ते भगवंत आहेत सख्यांनो, पांडुरंग सगळ्या जगाचे आहेत. आपणही साऱ्याजणी इथच राहू, लांबूनच पांडुरंगांचा भक्तगोतावळा पहात राहू...!
म्हणून पंढरपुरी गेलात तर पहा, की रुखमाबाईचा वेगळा गाभारा आहे. मग सत्यभामेचा आणि राधेचा म्हणजे राहीचा गाभारा आहे. आरतीत या राहीचा आधी उल्लेख आहे. म्हणून भक्तजन म्हणतात, 'राही, रुखमाबाई, राणिया सकळा (सगळ्या)', ओवाळती राजा विठोबा सावळा..
कळतय का मंडळी.. नाहीतर स्वप्नजा कांहीही सांगते म्हणाल..! खरतर गोकुळातून द्वारकेला जाताना कान्हाने आपल्या राधेला वचन दिलेलं, मी बहुजनांचा... वारकऱ्यांचा, भोळ्या भाबड्या भक्तांचा पांडुरंग जेव्हा असेल ना तेव्हा तू सदैव राई रुपात माझ्यासोबत राहशील... तीच ही राही राधा...!
पण माझ्या मनात रुखमाबाईचं आक्रंदन जागत रहातं.. असं सर्वांसोबत जोडीदाराला वाटून घेणं कसं जमलं तिला. सावळी रुखमाबाई मुकपणानं द्वारका सोडून केवळ त्यांच्यासाठी सवतींबरोबर, अन भक्तांबरोबर पांडुरंगांला वाटून घेत राहिली...!
माझा नवरा, माझी मुलं आणि मी, बस्स अशी मानसिकता असलेल्या आजच्या पिढीला हे रुखमाबाईचं आक्रंदन कळेल का ? आपलं माणूस कधीच आपलं नव्हतं, ही वेदना रुखमाबाई बरोबर अनेक सख्यांची चिरंतन वेदना आहे.
होय ना सख्यांनो...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)