इसापनीतीच्या कथा लहान असताना साऱ्यांनीच वाचल्या असतील. हो ना..? ब्रम्हदेवांने म्हणे साऱ्यांनाच काही वैशिष्ट्ये दिली. मोराला सुंदर पंख, कोकीळेला कंठ, सिंहाला शौर्य, अशा अनेक प्राण्यांना अनेक गोष्टी दिल्या. मनुष्याला जाणिव, असामान्य बुध्दीमत्ता दिली.
पण तेवढ्यावर समाधान होईल तो माणूस कसला. त्याने ब्रम्हदेवांना दोन झोळ्या मागितल्या, एक छातीवर विसावेल आणि दुसरी पाठीवर. ब्रम्हदेवाने उत्सुकतेने विचारले, दोन झोळ्या? त्या कशासाठी? माणूस मोठा चलाख, तो उत्तरला, छातीवरच्या झोळीत मी दुसऱ्यांचे दोष ठेवीन अन् पाठीवरच्या झोळीत मी माझे दोष ठेवत जाईन.
म्हणून आपल्याला स्वतःचेच मोठे दोषही मोठे वाटत नाहीत. पण दुसऱ्यांचे बारीकसारीक दोषसुध्दा मोठे दिसतात. यावरुन मला आणखीन एक गोष्ट सांगाविशी वाटतेय. तुम्ही म्हणाल आज स्वप्नजा गोष्टी सांगायच्या मूडमध्ये आहे जणू..
एका गावात राजाने एक गोलाकार खोली बांधली होती. त्यात त्याने गोलाकार हजार आरसे लावले होते. त्या खोलीत सर्वांनाच जायला मुभा होती. तिथे रोज एका शेतकऱ्याची मुलगी जाई. अर्थात तिला तिच्या भोवती खूप मुली दिसायच्या.
ती खुश होऊन हसायची, टाळ्या वाजवायची, त्या मुलीही टाळ्या वाजवत, हसत.. हे पाहून त्या मुलीला ही जगातील सर्वोत्तम जागा वाटत असे. त्याच खोलीत एकदा एक त्रासलेला माणूस गेला. त्याच्याकडे रागाने पहाणारे प्रतिबिंब पाहून त्याने भडकून हात उगारला तर प्रतिबिंबानेही हात उगारला.
तो त्या खोलीच्या बाहेर आला व म्हणाला, सगळ्या जगातील बकवास जागा असेल ही. या दोन्हीही कथांपासून आपण काय शिकतो. तुम्ही ज्या नजरेने दुसऱ्यांकडे पहाता त्याच पध्दतीनुसार ते माणूस तुम्हाला दिसेल.
आत्मपरीक्षण न करता जे विचार समाजात पसरवतो तेच त्याच वेगाने आपल्याकडे परत येतात. हा निसर्गनियम आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यांतील मुसळ बघता बघता आपल्या डोळ्यांतील कुसळ काढणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायला लायक रहाता.
हे नात्यांचे बंध आहेत. यात गुंता होऊ देऊ नये. नात्यात गुंता वाढला तर तो सोडवता सोडवता आयुष्य निघून जाईल. जिथं सोडून देण्यासारखं आहे तिथं सोडून द्या. जिथं स्विकारण्यासारखं आहे, तिथं जरुर स्विकारा. तडजोड करण्यापेक्षा स्विकारणं फार सोप्पं.
जिथे नाती सुधारण्यासारखी आहेत तिथं जरुर सुधारा.. जिथे काहीच होणार नाही तिथे शांतपणे सोडून द्या. नात्यांना घट्ट पकडण्याचा अट्टाहास अजिबात नको. ते निर्जिव नातं घट्ट पकडून कोणीचं आनंदी होणार नाही..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)