यांना जगण्याची भाषा कळली. खूपच छोटे आहोत आपण यांच्यापुढे..

मराठी रंगभूमीला समृद्ध करणारी कितीतरी मोठी माणसे आपल्या सर्वांच्या आयुष्यात येऊन गेली. नाट्य, चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने उत्तुंग शिखरावर पोहोचलेली दिग्गज मंडळी रोजच्या जगण्यात कमालीची सहज, साधी असणं ही सर्वांसाठी प्रेरणा म्हणावी लागेल.


डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांना मराठी माणूस कसा विसरू शकेल..? यांनी व डॉ. नरेंद्र दाभोळकर, सदाशिव अमरापूरकर आदींनी एकत्र येत मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रांतील नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या कलाकार, कार्यकर्त्यांसाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभी करण्याची मोहीम सुरू केली.

या मोहिमेचा एक भाग म्हणुन अहमदनगर येथे पालिकेच्या म्युनिसिपल कौन्सिल हॉलमधे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक समितीचा सभापती होतो. या निमित्ताने मलाही या अभियानात सहभागी होता आलं.

कला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांच्या मदतीकरिता हिरीरीने सहभागी होणारी, डॉ. लागू, फुले, दाभोळकर, अमरापूरकर यांच्यासारखी विचारांचा समृद्ध ठेवा असलेली माणसे आजच्या समाज जीवनात आता कुठे पहायला मिळतील..?

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांचा सहवास लाभला. त्यांच्या सोबत गप्पा मारता आल्या. तेव्हा जाणवलं की यांना जगण्याची भाषा कळली आहे. खूपच छोटे आहोत आपण यांच्यापुढे.

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !