बापू कधीच मरत नाहीत.!

विराट आकाशासारखा
एक शक्तिमान, एक अशक्त म्हातारा
आपल्या हातात कधीच
आख्खा येत नाही..!

कधी असहकार आंदोलन,
कधी सत्याग्रह, कधी अहिंसा..
कधी दांडी यात्रेत..
लोक कुठे कुठे शोधत रहातात.

महात्मा नावाची कृतीत सापडतात बापू.!
जातीजातीत विखरुल्या देशाला
एका टोपीखाली भारताला एकसंघ आणणारे बापू..
कुणाच्याच हातात आख्खे येत नाहीत

भेटत रहातात निवडणुकीच्या
प्रचारात बापू..
त्यांच्याच मनाविरुध्द..
भेटतात बापू मनाविरुध्द व्यासपीठावर
अभिनेत्यांच्या डोळ्यांतील खोट्या पाण्यात

संपवायचा प्रयत्न करत रहातात लोक बांपूना..
एका गोळीने कुठे संपले बापू
मग परत परत मारत राहिले बांपूना
पण मेलेच नाहीत बापू

त्या मूढांना कुठे माहित आहे?
बापू कधीच मरत नाहीत.!

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(स्त्री-स्पंदन या कविता संग्रहात पूर्व प्रकाशित २००१)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !