छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले वरदान. चार पातशाहंनी महाराष्ट्राला बेजार केले होते. शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांना हे सहन होत नव्हते. म्हणून शहाजी महाराजांनी आऊसाहेबांना छत्रपतींना घेऊन पुण्याला पाठवले. छत्रपतींच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि महाराष्ट्राचे भाग्य पालटले.
महाराजांनी किल्ले जिंकता जिंकता किल्ल्यांची निर्मितीही केली. शिवाजी महाराज अतिशय उत्तम स्थापत्य विशारद होते. महाराजांनी राज्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन किल्ले बांधले होते. किल्ल्यांमध्ये साधारण प्रमुख चार प्रकार असतात.
जलदुर्ग - हे पाण्यात किंवा समुद्रालगतच्या बेटावर, नदीजवळ बांधतात. महाराजांनी हिरोजी इंदूलकर या स्वराज्याच्या स्थापत्य अभियंत्याकडून सिंधुदुर्ग बांधून घेतला. शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केले. कोकणचा बराचसा भाग असल्याने साधारण १६५८ ला शिवरायांनी १०० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा मिळवला.
समुद्री शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी आता लढाऊ आरमार आवश्यक होते. म्हणूनच सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गची निर्मिती झाली. दि. २४ ऑक्टोबर १६५७ ला भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली आणि म्हणूनच २४ ऑक्टोबर हा 'भारतीय आरमार दिन' किंवा 'मराठा आरमार दिन' साजरा करतात.
कान्होजी आंग्रे हे आपले पहिले आरमार सेनापती. 'गिरी दुर्ग' उंच डोंगरावर निर्माण झालेल्या किल्ल्यांची बांधणी पाहाताना मन आश्चर्याने थक्क होते आणि आदराने मान झुकते. अत्यंत सुरक्षित आणि महाराजांच्या दुरदृष्टीचे उदाहरण म्हणजे रायगड किल्ला.
डोंगरी किल्यांमध्ये राजगड, रायगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी, राजमाची, पन्हाळगड, लिंगाणा हे स्वराज्याची शान असलेले किल्ले. तर भुई म्हणजे जमीन. भुईवरील सुरक्षित जागा म्हणजे भुईकोट किल्ले. यात बहादुरगड, नळदुर्ग, अहमदनगर किल्ला हे भुईकोट किल्ले.
वनकिल्ले - घनदाट जंगलामध्ये सुरक्षिततेसाठी बांधलेले दणकट किल्ले. शिवाजी महाराजांनी गोव्याच्या सीमेवरील पारगड हा किल्ला जांभ्या दगडात बांधला आहे. इथे महाराजांनी अत्यंत रेखीव मूर्ती असलेली भवानीचे महिषासुरमर्दिनीच्या रुपातील मंदिर बाधले आहे.
तानाजी मालसुरेंच्या स्वराज्यासाठी बलिदान दिल्यानंतर छत्रपतींनी स्वतः पिता म्हणून उभे राहून रायबाचे लग्न करुन दिले. आणि हा पारगड किल्ला मालुसरे परिवाराला दिला. हा किल्ला देताना महाराजांनी सांगितले की, चंद्रसुर्य असेपर्यंत इथे मालुसरेंचा दिवा लागला पाहिजे. अजूनही तिथे तानाजी आणि रायबा मालुसरे यांचे वंशज आहेत.
किल्ल्यांची अंर्तगत रचना - राणी वसा (राण्यांची रहाण्याची व्यवस्था), दिवाण ई खास (अधिकारी वर्गाची चर्चा करायची जागा), यालाच खलबत खानाही म्हणत. अंबरखाना (धान्याचे कोठार), राजमहाल, दरबार हॉल (राजांचा दरबार भरवण्याची जागा), बांधकाम असेच असे. त्या जागा आजही वातानुकुलित होत्या हे कळते.
जागोजागी पाण्याच्या विहिरी, तलाव, सुंदर बागा असत. भोवताली संरक्षक उंच भिंत, कोपऱ्यांना मनोरे, गुप्त खजिना ठेवण्यासाठी गुप्त जागा, शस्त्रागारे, दारुगोळ्याची कोठारे, गुप्तमार्ग, इत्यादी गोष्टी असत. प्रवेशद्वाराजवळ देवडी (पहारेकरी बसण्याची जागा). प्रवेशद्वारही जवळजवळ लांबी २५ फूट, रुंदी १३ फूट असे.
किल्ल्यांचे बांधकाम - जांभा दगड, संगमरवर, ग्रॅनाईट, चुनखडी, लोखंडी कांब वितळवून त्याचे केलेले बांधकाम, मातीच्या आजतागायत सुस्थितीत असलेल्या मातीच्या पाईप्स, लोखंडी पट्टे, रंगीबेरंगी काचा, याचा वापर केला जाई. दरवाजे, खिडक्या, आतील फर्निचरच्या सुशोभनासाठी सोने, चांदी, मौल्यवान खडे, आरशाचे तुकडे वापरले जात.
ही सर्व निवासस्थाने, इतर सदनांच्या, कार्यालयाच्या युध्द पध्दतीनुसार जागा बदलत असत. पण भारतात इंग्रजाचे आगमन झाल्यावर त्यांच्या उपजत असलेल्या विध्वंसक वृत्तीनुसार त्यांनी सर्व किल्ल्यांचा विध्वंस केला. तरीही जे काही किल्ले आज आपल्याला पाहायला मिळतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती देतात.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)